मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jiah Khan : पहिल्याच चित्रपटातून नाव कमावलं अन् प्रेमात आयुष्य गमवलं! जिया खानबद्दल ‘हे’ माहितीये?

Jiah Khan : पहिल्याच चित्रपटातून नाव कमावलं अन् प्रेमात आयुष्य गमवलं! जिया खानबद्दल ‘हे’ माहितीये?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2023 06:48 PM IST

Jiah Khan Birth Anniversary : करिअर यशाच्या शिखरावर असतानाच जियाने आपलं आयुष्य संपवत, सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता.

Jiah Khan
Jiah Khan

Jiah Khan Birth Anniversary : जिया खान ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक अशी अभिनेत्री होती, जिने पहिल्याच चित्रपटातून तुफान प्रसिद्धी मिळवली. करिअर यशाच्या शिखरावर असतानाच जियाने आपलं आयुष्य संपवत, सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी जिया खान हिने आपलं आयुष्य संपवलं होतं. ‘निशब्द’ सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी जिया हिचा आज वाढदिवस आहे. आज जरी जिया या जगात नसली, तरी चाहत्यांच्या मनात तिच्या आठवणी कायम ताज्या आहेत.

जिया खानची बॉलिवूड कारकीर्द तशी फारच लहान होती. तिने अगदी मोजकेच चित्रपट केले. परंतु, या चित्रपटांमध्ये ती बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना दिसली. जिया खान मोठी स्वप्ने उराशी बाळगून सातासमुद्रापारहून मुंबईत आली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'निशब्द' हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला होता. जिया खानने अमिताभ बच्चन यांच्यानंतर आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या अभिनेत्यांसोबतही काम केले होते.

जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. तिचे वडील अली रिझवी खान हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक होते, तर आई राबिया अमीन याही हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होत्या. आईकडूनच जिया खानला अभिनयाचा वारसा मिळाला होता. जियाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये अभिनय आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला होता.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जियाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान तिला राम गोपाल वर्माच्या ‘निशब्द’मध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'निशब्द' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, तेव्हा या चित्रपटाचे नाव सर्वांच्याच ओठावर होते. या चित्रपटाने जियाला प्रसिद्धी बरोबरच अनेक गोष्टी मिळवून दिल्या. तिच्यासाठी बॉलिवूडची कवाडं खुली झाली होती. यानंतर जिया खान, आमिर खानसोबत 'गजनी' या चित्रपटामध्ये झळकली. तर, २०१०मध्ये प्रदर्शित झालेला 'हाऊसफुल' हा जियाचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती.

मात्र, या दरम्यान जियाच्या आयुष्यात अनेक वादळं आली. प्रेमात धोका मिळाल्याने जिया कोलमडून गेली होती. या सगळ्यात तिने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग