मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: प्रेक्षकांच्या मतांना मिळाला मान; शिव ठाकरेच्या गळ्यात ‘बिग बॉस १६’च्या कॅप्टनपदाची माळ!

Bigg Boss 16: प्रेक्षकांच्या मतांना मिळाला मान; शिव ठाकरेच्या गळ्यात ‘बिग बॉस १६’च्या कॅप्टनपदाची माळ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 28, 2022 10:00 AM IST

Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये विजयी ठरत शिव ठाकरे घराचा नवा कॅप्टन बनला आहे.

Shiv Thakare
Shiv Thakare

Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’च्या घरात सहभागी झालेला मराठमोळा स्पर्धक शिव ठाकरे याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये विजयी ठरत शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’च्या घराचा नवा कॅप्टन बनला आहे. या टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये तूतू-मैमै पाहायला मिळाली आहे. आदल्या दिवशी आठ सदस्य नॉमिनेट झाल्यानंतर, आता त्यांना घरासाठी नवीन कॅप्टन निवडायचा होता. यासाठी बिग बॉसने केवळ सेफ असलेल्या सदस्यांनाच संधी मिळणार अशी घोषणा केली होती.

बिग बॉसच्या या घोषणेनंतर पुन्हा एकदा घरातील सदस्यांमध्ये बाचाबाची झालेली पाहायल मिळाली. मात्र, नंतर कॅप्टन पदाच्या शर्यतीसाठी शिव ठाकरे, अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या तिघांची नावे निश्चित झाल्यानंतर कॅप्टनसी टास्क सुरू झाला. यावेळी कॅप्टनपदासाठी निवडणूक होणार असल्याचे बिग बॉसनी सर्वांना सांगितले. या निवडणुकीचा नियम स्पष्ट करताना बिग बॉस म्हणाले की, टास्कमध्ये एकूण ३ फेऱ्या असतील, ज्यामध्ये पहिल्या फेरीत उमेदवारांना स्वतःची प्रशंसा करावी लागणार आहे. तर, दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्ध्यावर टीका करावी लागेल आणि तिसऱ्या फेरीत एक सादरीकरण करावे लागेल.

या कॅप्टनसी टास्कमध्ये एक ट्वीस्ट देखील होता. बिग बॉसने सांगितले की, घराच्या कॅप्टनची निवड प्रेक्षक करणार आहेत. या निवडणुकीसाठी चिन्ह म्हणून शिवला घोडा, अब्दू रोजिकला ससा आणि एमसी स्टॅनला जिराफ मिळाले होते. यानंतर पहिली फेरी सुरू झाली आणि तिघांनीही आपण कॅप्टनपदासाठी का पात्र आहोत, हे सांगितलं. त्यानंतर उर्वरित दोन फेऱ्या देखील पार पडल्या.

तिन्ही फेऱ्या संपल्यानंतर बिग बॉसने प्रेक्षकांनी केलेल्या मतदानाच्या आधारे शिव ठाकरे याला घराचा नवा कॅप्टन म्हणून घोषित केले. ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता ठरलेला शिव ठाकरे आता ‘बिग बॉस १६’ देखील गाजवत आहे. त्याने आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

IPL_Entry_Point

विभाग