Lok sabha Election 2 phase voting Maharashtra : राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ८ जागांवर हे मतदान पार पडणार आहे. वर्धा, यवतमाळ-वाशिम, अकोला, अमरावती, हिंगोली, बुलढाणा, नांदेड व परभणी या लोकसभा मतदारसंघांत लोकशाहीचा उत्सव आज होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विदर्भात ५ तर मराठवाड्यात ३ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. राज्यात एकूण २०४ उमेदवार या टप्यात रिंगणात आहेत. तर १६ हजार ५८९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीत राज्यातील १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या साठी तयारी पूर्ण करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था देखील चोख करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. हे मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे.
आठही लोकसभा मतदारसंघांत या वर्षी नवमतदार वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अमरावतीत ३७ त्याखालोखाल परभणीत ३४, हिंगोलीत ३३, वर्ध्यात २४, नांदेडमध्ये २३, बुलढाणा २१, यवतमाळ-वाशीम १७ तर अकोल्यामध्ये १५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत .
विदर्भात होणाऱ्या पाच मतदार संघापैकी अमरावती मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी भाजप कडून नवनीत राणा तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे रिंगणात उतरले आहे. तर दिनेश बुब सत्ताधारी आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे येथे तिरंगी निवडणूक होणार आहे.
वर्ध्यात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होत आहे. तर शेतकरी नेते रवीकांत तुपकर हे देखील रिंगणात असल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. तर वंचितचे वसंत मगर हे देखील उभे असून मतदार राजा कुणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अकोला येथे तापमानासोबट राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
यवतमाळ-वाशिममध्ये मतदार संघात हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील तर उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख हे रिंगणात असून दोघांधे थेट लढत होणार आहे.
हिंगोलीमध्ये देखील निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सिवसेना कडून नागेश आष्टीकर, तर शिवसेनेचे (शिंदे) बाबुराव कोहळीकर यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघांत शिवसेनेने आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांची काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्याशी थेट लढत होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आला.
परभणी मतदारसंघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे.
संबंधित बातम्या