Narendra Modi in Malda : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या राज्यांत दौरे करत आहेत. पश्चिम बंगालमधील मालदा इथं शुक्रवारी मोदींची सभा झाली. त्यावेळी झालेली प्रचंड गर्दी पाहून मोदी भावूक झाले. ‘तुमचं प्रेम पाहून असं वाटतं की मागच्या जन्मी मी बंगालमध्ये जन्मलो असेन किंवा माझा पुढचा जन्म बंगालमध्ये होईल,’ अशा शब्दांत मोदी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
'तुम्ही लोक इतक्या मोठ्या संख्येनं आलात की मैदान लहान झालं आहे. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो. विकासाच्या माध्यमातून तुमचं हे प्रेम परत करीन, असं मोदी यावेळी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी यावेळी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर सडकून टीका केली.
'ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये शिक्षक घोटाळा, रेशन घोटाळा सर्व काही सुरू आहे. दिल्लीहून बंगालच्या लोकांना जे पैसे पाठवले जातात, ते तृणमूलचे सावकार अडवतात. हे लोक पैसे खातात. या सरकारनं गरीबांना ५ लाख रुपयांचे मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना बंद केली आहे. केंद्रातील सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचे ८००० कोटी रुपये बंगालच्या शेतकऱ्यांना पाठवले आहेत. ते सुद्धा ममता सरकारनं थांबवले आहेत, असा आरोप मोदी यांनी केला.
माँ, माती आणि मानुषच्या नावानं सत्तेवर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं महिलांचं सर्वाधिक नुकसान केलं आहे. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिहेरी तलाक रद्द केला, पण टीएमसी सरकार विरोधात होतं. संदेशखली इथं महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला हे सरकार वाचवत होतं. तुमच्या सुखदुखाशी या सरकारला काही देणंघेणं नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरही भाष्य केलं. ‘हिंदू, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन लोकांचा कोणत्याही देशात छळ झाला तर ते कुठं जाणार? त्यांच्यासाठी जागा कुठं आहे? त्या लोकांना आम्ही नागरिकत्व देत आहोत. मग यात ममता सरकारला काय अडचण आहे?, असा सवाल मोदींनी केला. देशाच्या संपत्तीच्या वितरणावरून मोदींनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. 'आमच्याकडं एक्स-रे आहे. कोणाकडं काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही ते काढून घेणार असं काँग्रेस म्हणते. तृणमूल काँग्रेसचाही राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, असा दावा मोदींनी केला.
संबंधित बातम्या