मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group Stocks : अदानी प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ, कंपन्यांचे शेअरही कोसळले!

Adani Group Stocks : अदानी प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ, कंपन्यांचे शेअरही कोसळले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 14, 2023 02:42 PM IST

Adani Group Stocks News Today : अदानी समूहावर झालेल्या आरोपाच्या चौकशीसाठी संसदीय समितीची स्थापना करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली असून त्याचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवर दिसत आहे.

Gautam Adani
Gautam Adani

Adani Group Stocks : हिंडनबर्ग संस्थेचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही. अदानी समूह यातून सावरत असल्याचं वाटत असतानाच आता राजकीय पातळीवर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांच्या संबंधांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. त्याचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवरही झाला आहे.

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स आज ७ टक्क्यांपेक्षाही जास्त घसरले आहेत. चार कंपन्यांच्या समभागांना लोअर सर्किट लागलं आहे. बीएसईवर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) चा शेअर ९.२५ टक्क्यांनी घसरून १७०१.१० रुपये प्रति शेअर झाला आहे. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये १.८३ टक्क्यांची घसरण झाली असून हा शेअर सध्या ७०४ रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.

‘या’ कंपन्यांनाही फटका

एसीसी सिमेंटचा शेअर १.१८ टक्क्यांनी घसरून १७४९.१५ रुपयांवर, अदानी विल्मरचा शेअर २.८५ टक्क्यांनी घसरून ४२३ रुपयांवर, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ३.७१ टक्क्यांनी घसरून ६५५.७० रुपयांव व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, अंबुजा सिमेंटचा शेअर ३.४९ टक्क्यांनी घसरून ३५५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

‘या’ शेअरना लोअर सर्किट

अदानी समूहातील NDTV, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस या चार कंपन्यांच्या शेअर्सना सुरुवातीच्या सत्रात लोअर सर्किटला लागले. एनडीटीव्ही २११.१० रुपये, अदानी पावर २०४.३५ रुपयांवर, अदानी ट्रान्समिशन ९०२.२० रुपयांवर, अदानी टोटल गॅस ९४७.२० रुपयांवर ट्रेड करत आहे.

सरकार काय म्हणते?

अदानी समूहावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी सरकारनं कोणतीही समिती स्थापन केलेली नाही, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं. सेबीनं आधीच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिन्यांत हा तपास पूर्ण केला जाईल, असंही चौधरी यांनी सांगितलं. खासदार टीएन प्रतापन, मनीष तिवारी आणि जोथिमनी सेन्निमलाई यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

WhatsApp channel