मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Debt : अदानी समूहावर इतक्या कोटींचं कर्ज, एसबीआय, एलआयसी संकटात?

Adani Debt : अदानी समूहावर इतक्या कोटींचं कर्ज, एसबीआय, एलआयसी संकटात?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 06, 2023 09:03 PM IST

Adani Debt : अदानी समूहाच्या घडामोडींबद्दलचे वातावरण संसदेत चांगलेच तापले आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावर सरकारला घेरले असून देशाचा पैसा अशा प्रकारे कर्ज देऊन बुडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. खरच एसबीआय, एलआयसीसारख्या वित्तीय संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे का ?

adani HT
adani HT

Adani Debt : अदानी समूहात सुरू असलेल्या उलथापालथीची सध्या देश विदेशात चर्चा होत आहे. २४ जानेवारीपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू झालेली घसरण आजतागायत सुरू आहे. आजही अदानी एंटरप्रायझेसमध्ये ७ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे. गौतम अदानी यांनी अदानी एंटरप्रायझेसच्या माघार घेतली आहे. आज बातमी आली आहे की, अदानी समूह आपली भांडवली विस्तार योजना कमी करणार आहे.

अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण बँकांच्या चिंता वाढवणारी

साहजिकच या सर्व बातम्या देशातील बड्या बँका, वित्तीय संस्था, एलआयसीसारख्या मोठ्या कंपन्या, सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण बनत आहेत. प्रत्यक्षात देशातील अनेक बँकांचे अदानी समूहावर ८० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. सरकारच्या सांगण्यावरुन सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका आणि एलआयसीसारख्या बड्या वित्तीय संस्थांनी अदानी समूहाला मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली. आता या समूहाची घसरलेली एकूण संपत्ती देशातील महत्त्वाच्या वित्तीय संस्थांचे भांडवल कमी करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा यांनी त्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. एसबीआयनेही त्यांनी दिलेले कर्ज धोक्यात नसल्याचे म्हटले आहे. अदानी समुहाकडे असलेल्या एकूण कर्जापैकी एसबीआयचे कर्ज हे एसबीआयच्या एकूण कर्जाच्या केवळ ०.८ टक्के ते ०.९ टक्के आहे. अशा परिस्थितीत अदानी समूहावर किती कर्ज आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

एसबीआयचे कर्ज

अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबाबत, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, अदानी समुहाला एसबीआयचे एक्सपोजर २७ हजार कोटी रुपये आहे, हे प्रमाण एकूण कर्जाच्या केवळ ०.८ ते ०.९ टक्के आहे. या कर्जप्रकरणी दिनेश खारा म्हणाले की, आम्ही अदानी समूहाच्या टॅन्जेबल असेस्टसाठी कर्ज दिले आहे आणि त्यांच्याकडे पुरेसे रोख संकलन आहे. अदानी समूह बँकेच्या कर्जाची थकबाकी भरण्यास सक्षम आहे.

पीएनबी, बँक आँफ बडोदा

अदानी समुहावर बँक ऑफ बडोदाचे ५५०० कोटी तर पंजाब नॅशनल बँकेचे ७००० कोटींचे कर्ज आहे.

हिडेनबर्गचा दावा

हिंडेनबर्ग रिसर्चनुसार, अदानी समूहाच्या अनेक कंपन्या रोख प्रवाह निर्माण करत नाहीत आणि त्यांच्या तारण ठेवलेल्या शेअर्सचे मूल्यही कमी होत आहे. अशा परिस्थितीत, अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य घसरल्याने तारण ठेवलेल्या रोख्यांचे मूल्यही कमी होत आहे.

एलआयसीचे एक्सपोजर

एलआयसीचे म्हणणे आहे की अदानी समूहावर ३६,४७४.७८ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते कर्ज आणि इक्विटीच्या रूपात आहे. एलआयसीने अदानी एंटरप्रायझेसच्या नुकत्याच झालेल्या एफपीओमध्ये ९,१५,७४८ शेअर्स खरेदी करण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च केले आणि कंपनीची अदानी एंटरप्रायझेसमध्ये आधीच ४.२३ टक्के हिस्सेदारी आहे. एलआयसीची अदानी समूहातील इतर कंपन्यांमध्येही भागीदारी आहे. ज्यात अदानी पोर्ट्समधील ९.१४ टक्के आणि अदानी टोटल गॅसमध्ये ५.९६ टक्के हिस्सा आहे. समूहाच्या कंपन्यांच्या घसरणीमुळे, एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी होत आहे, जे चिंतेचे कारण असू शकते.

अँक्सिस बँकेचे कर्ज

नियामक फाइलिंगमध्ये माहिती देताना अॅक्सिस बँकेने सांगितले की, आम्ही कोणत्याही कंपनीला कर्जाची रक्कम केवळ सुरक्षा, दायित्व आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता या आधारावर देतो. बँकेने सांगितले की अदानी समूहाला दिलेले फंड आधारित कर्ज ०.२९ टक्के आहे, तर नॉन फंड आधारित कर्ज ०.५८ टक्के आहे. ३१ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार, बँकेने ०.०७ टक्के गुंतवणूक केली आहे. अॅक्सिस बँकेने सांगितले की ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १.५३ टक्के मानक मालमत्ता कव्हरेजसह मजबूत ताळेबंद आहे.

तज्ज्ञांच्या मते, काळजी करण्याचे कारण नाही. कारण सरकारी-खाजगी बँकांव्यतिरिक्त, एलआयसीसारख्या वित्तीय संस्थांचे कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्कच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. याशिवाय, ते रोख उत्पन्न करणार्‍या मालमत्तेद्वारे देखील सुरक्षित केले जातात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या