मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC in Adani group : अदानी समूहामुळे एलआयसी कंगाल? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण

LIC in Adani group : अदानी समूहामुळे एलआयसी कंगाल? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 30, 2023 04:27 PM IST

LIC investment in Adani Group : हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण -

LIC bids on Adani group HT
LIC bids on Adani group HT

LIC investment in Adani Group : हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात कमालीची घसरण पहायला मिळाली. या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. अदानी समुहाचे शेअर्स गडगडल्यामुळे ज्या गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झाले त्यात सरकारी कंपनी एलआयसीचा समावेश आहे. या दोन दिवसात एलआयसीला तब्बल अंदाजे १६८५० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

त्यामुळे एलआयसीची ही अवस्था तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे किती कोट्यवधींचे नुकसान झाले असावे याचा हिशोब लावणे सध्यातरी कठीण आहे.

एलआयसी झाली कंगाल ?

अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीनंतरही एलआयसीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नाण्याची एक बाजू आहे. तर दुसरीकडे अदानी ग्रुपच्या शेअर्समधील घसरणीनंतर एलआयसीने आपली समुहातील गुंतवणूक कायम ठेवली असून त्यावर १०० टक्के नफा कमावला आहे. एलआयसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने अदानी समुहात अंदाजे २८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. अदानी समुहातील शेअर्समधील घसरणीनंतरही शुक्रवारी एलआयसीची गुंतवणूक मालमत्ता मूल्य अंदाजे ५६ हजार कोटी रुपये होती. याचाच अर्थ अदानी समूहाच्या शेअर्स घसरणीनंतरही एलआयसीला २८ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला.

या कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक

अदानी एन्टरप्राईजेस - या कंपनीमध्ये एलआयसीचा हिस्सा ४.२३ टक्के आहे. याचाच अर्थ एलआयसीजवळ ४,८१,७४,६५४ शेअर्स आहेत.

अदानी पोर्ट्स ः एलआयसीची या कंपनीत गुंतवणूक अंदाजे ९.१४ टक्के आहे. एलआयसीजवळ या कंपनीतील अंदाजे १९,७५,२६,१९४ शेअर्स आहेत.

अदानी ट्रान्समिशन - आँक्टोबर ते डिसेंबर २०२२ तिमाहीपर्यंत शेअर होल्डिंगच्या पॅटर्न्सनुसार, अदानी ट्रान्समिशनमध्ये एलआयसीची हिस्सेदारी ३.६५ टक्के आहे. याचाच अर्थ एलआयसीजवळ या कंपनीचे ४,०६,७५,२०७ शेअर्स आहेत.

अदानी ग्रीन - डिसेंबर २०२२ तिमाहीपर्यंत एलआयसीची कंपनीतील हिस्सेदारी १.२८ टक्के होती. एलआयसीजवळ कंपनीचे अंदाजे २,०३०९,०८० शेअर्स आहेत.

अदानी टोटल गॅस - चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत अदानी समुहातील एलआयसीची हिस्सेदारी अंदाजे ५.९६ टक्के आहे.अदानी समुहाच्या या शेअर्सला सोमवारपर्यंत २० टक्के लोअर सर्किट लागले होते.

एलआयसीचा अदानी समूहावर विश्वास

सध्या बाजारात अदानी समुहावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तरीही एलआयसी मात्र या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहे. अदानी समुहाच्या एफपीओला एलआयसीने सबस्क्राईब्ड केले आहे. ही आकडेवारी नेमकी किती आहे, हे ३ फेब्रुवारीला समजेल. कारण या दिवशी एफपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना शेअर्स अलाॅट्स केले जातील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या