मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray Sabha: राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, अन्यथा..
राज ठाकरे

Raj Thackeray Sabha: राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, अन्यथा..

Apr 12, 2022, 08:54 PMIST

राज ठाकरेंनी आज मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. धर्म तुमच्या घरात ठेवा, रस्त्यावर आणण्याची गरज नाही. सणासुदीला लाऊडस्पीकर ठीक आहे मात्र ३६५ दिवस महाराष्ट्रात हे चालणार नाही, हे खपवून घेतले जाणार नाही. सध्या मी हनुमान चालिसा सांगितली आहे. माझ्या भात्यातील बाण काढायला लावू नका.

Apr 12, 2022, 08:39 PMIST

..त्यामुळे शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाहीत

शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठ्यांची माथी भडकवायची असतील… त्यांच्याच एका भाषणात अफजलखान इथे आला, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. तो हिंदू-मुस्लीम नव्हता म्हणे. मग तो आला कशासाठी होता? तो काय  महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का?

Apr 12, 2022, 08:27 PMIST

पवारांनी दोन महिन्यात भूमिका बदलली आम्ही भूमिका बदलली नाही

शरद पवारांनी १९९८ मध्ये परदेशी पंतप्रधान पदाच्या मुद्यावरून काँग्रेस सोडून नवा पक्ष काढला मात्र दोन महिन्यात पवारांनी भूमिका बदलली व निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर गेले व कृषीमंत्री झाले. त्यांनी आमच्या भूमिकेवर बोल नये

Apr 12, 2022, 08:24 PMIST

मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवली...

२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक

Apr 12, 2022, 08:21 PMIST

३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही

३ मे रोजी ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही.

Apr 12, 2022, 08:19 PMIST

..तर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!

भोंग्याविरोधात मी याआधीही बोललो आहे. मात्र यांना केवळ गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!

Apr 12, 2022, 08:17 PMIST

राज ठाकरेंची जयंत पाटील यांना उत्तर

जयंत पाटील म्हणतात, हा विझलेला पक्ष आहे. जंतराव, हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरावर थोडं इकडे-तिकडे झालेलं असेल तर सांभाळून घ्या. हे काय मला सांगतात. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कुणी हुंगून विचारत नाहीत. मला सांगतात यांचे आमदार कुठे गेले. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणाऱ्या उमेदवारांची मोळी आहे. त्याची दोरी फक्त शरद पवार आहेत. ही माणसं दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेली, तरी निवडून येतील.

Apr 12, 2022, 08:15 PMIST

राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ!

राज ठाकरेंनी आपल्या मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात आपल्याच विधानांचे २८ जुलै २०१८, एक ऑगस्ट २०१८, २३ जानेवारी २०२० असे तीन व्हिडीओ अजित पवारांसाठी वाजवले. यामध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत त्यांनी भूमिका मांडली होती.

Apr 12, 2022, 08:05 PMIST

अजित पवारांकडे रेड पडते. सुप्रिया सुळेंच्या घरी का नाही, राज यांचा सवाल

एकाच घरात राहून अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते.  तुमच्या घरी कधी धाड पडत नाही. शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.

Apr 12, 2022, 08:01 PMIST

मोदींकडे माझ्या दोन मागण्या आहेत -राज ठाकरे

आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा.

Apr 12, 2022, 08:01 PMIST

नोटीस राजकीय असो की कुणाचीही असो, मी त्याला भीक घालत नाही

आयएलएफएस कंपनीची चौकशी होती, कोहिनूरची, त्यातून मी एका वर्षात बाहेर पडलो होतो. म्हणजे कुणी व्यवसायही करायचा नाही का? त्यासंदर्भात मला ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त ईडीची नोटीस येतेय अशी चाहूल लागली होती. त्यावरून केवढं नाटक केलं. आणि या हातांनी काही पापच केलं नाही, तर नोटीस राजकीय असो की कुणाचीही असो, मी त्याला भीक घालत नाही

Apr 12, 2022, 08:01 PMIST

ईडीच्या नोटीसीला भिऊन ट्रॅक बदलला नाही,  त्यामुळे तेव्हा  मोदीविरोधात बोलत होतो

मला तेव्हा मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तेव्हा मी उघडपणे बोललो. आता हे म्हणतायत, मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मला नाही गरज ट्रॅक बदलायची.

Apr 12, 2022, 07:54 PMIST

माझ्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने दिल्याची टीका झाली, याचे उत्तर द्यावे लागेल 

माझ्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने दिल्याची टीका झाली, याचे उत्तर द्यावे लागेल असे राज ठाकरे म्हणाले. आज काही पत्रकार राजकीय पक्षाचे प्रवक्ते झालेत. मी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख भाषणात केला. यामध्ये भाजपने स्क्रिप्ट लिहिल्याचा संबंध येतो कोठे.

Apr 12, 2022, 07:54 PMIST

माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळाले मात्र पवारांच्या घरी आंदोलक जाणार हे कळाले नाही - राज ठाकरे

राज ठाकरेंनी सुरुवातीलाच टोला लगावला. राज म्हणाले की, मुंबई पोलिसांना सर्व समजते ते म्हणाले की आज माझा ताफा अडवणार आहेत. मात्र त्यांना हे समजले नाही, की पवारांच्या घरी आंदोलक जाणार आहेत. 

Apr 12, 2022, 07:34 PMIST

लाव रे तो व्हिडिओचा दुसरा पार्ट पाहायला मिळणार?

सभास्थळी ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओचा दुसरा पार्ट पाहायला मिळेल अशी चर्चा आहे.

Apr 12, 2022, 07:34 PMIST

राज ठाकरे सभास्थळी दाखल, थोड्याच वेळात भाषण

राज ठाकरे ठाण्यातील सभास्थळी दाखल झाले आहेत. त्याच्याबरोबर अमित ठाकरेही दाखल झाले आहेत. कोणत्या मुद्यांना राज ठाकरे हात घालणार याची उत्सुकता आहे. 

Apr 12, 2022, 07:25 PMIST

माझी जात न बघता राज ठाकरेंनी पद दिले - सलीम शेख

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर राज ठाकरेंनी माझी जात न बघता मला सभागृह नेता केले. राज ठाकरे त्यावरही थांबले नाहीत. नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीची चावी स्थायी समितीचे सभापतीपद देखील मला दिले. गटनेता केले. ते कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते, यापुढेही राहणार नाहीत असे सलीम शेख म्हणाले.

Apr 12, 2022, 07:25 PMIST

आमचा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही - सलीम शेख

महाराष्ट्रामध्ये वेगळे चित्र रंगवलं जात आहे.  काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावेत असे आवाहन मनसे नेते सलीम शेख यांनी केलं आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की राज साहेब कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत

Apr 12, 2022, 07:25 PMIST

 पैगंबर,  शिवराय अन्  आंबेडकरांच्या विचाराचा  माझा डीएनए - सलीम शेख

राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर  माझा डीएनए काय आहे, असा सवाल विचारण्यात आला होता. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माझ्यामध्ये डीएनए आहे, असे नाशिक येथील मनसे नेते सलीम शेख म्हणाले.

Apr 12, 2022, 07:25 PMIST

कोरोना काळात जी कामे सरकारने करायला हवी होती ती मनसेने केली - वसंत मोरे

कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो. या कोरोना काळात काम करण्यात सरकार अपयशी ठरले. त्या वेळी जी कामे सरकारने करायला हवी होती ती कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. असे वसंत मोरे म्हणाले

Apr 12, 2022, 07:25 PMIST

..तर आपल्याला अमेरिकेतून ऑफर येतील- वसंत मोरे

आपल्या भाषणात वसंत मोरे म्हणाले की, गेल्या ४-५ दिवसांत राज्यातल्या प्रत्येक पक्षाने मला ऑफर दिली. जर राज ठाकरेंना एकहाती सत्ता दिली, तर आपल्या लोकांना अमेरिकेतून ऑफर येतील – वसंत मोरे

Apr 12, 2022, 07:25 PMIST

मुलूंड चेकनाक्यापासून १ हजार दुचाकीस्वार राज ठाकरेंना सभास्थळी घेऊन जाणार

विक्रोळी इथं कार्यकर्त्यांची गर्दी पाहता राज ठाकरे यांनी गाडी थांबवली आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर दुचाकी, चारचाकी असा राज ठाकरेंच्या गाडीचा ताफा ठाण्याच्या दिशेने रवाना झाला. राज ठाकरेंच्या रॅलीत मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाल्याचं दिसून आले. राज ठाकरे ठाण्यात पोहचण्याआधीच मुलुंड चेकनाक्याला ठाण्यातील कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार असून त्याठिकाणाहून १ हजार दुचाकी राज ठाकरेंना सभास्थळी घेऊन जाणार आहेत. राज ठाकरेंच्या रॅलीत भगव्या झेंड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

Apr 12, 2022, 07:25 PMIST

वसंत सेना ते शरद सेना असा शिवसेनेचा प्रवास - संदीप देशपांडे

आम्हाला भाजपची बी टीम संबोधताना आपला इतिहास पाहा.शिवसेनेला आधी वसंत सेना म्हणत होते. आधी वसंत सेना ते आता शरद पवार सेना हा शिवसेनेचा इतिहास आहे. असे संदीत देशपांडे म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्रीही केली.

Apr 12, 2022, 07:25 PMIST

संपलेल्या पक्षावर काहीजण पत्रकार परिषदा घेत आहेत -शालिनी ठाकरे

संपलेल्या पक्षावर हे लोक पत्रकार परिषदा घेत आहेत, प्रश्न उभे करत आहेत. तसं तर वाटत नाही की त्यांनी संपलेल्या पक्षासाठी हे सगळं करायला हवं – शालिनी ठाकरे

Apr 12, 2022, 07:25 PMIST

आधी लगीन कोंढाण्याचं...! -वसंत मोरे

 

मला निमंत्रणाची गरज नाही. साहेबांनी काल सांगितलं होतं की तू ठाण्याला ये. माझ्या घरचा आज कार्यक्रम आहे. पण आधी लगीन कोंढाण्याचं. त्यामुळे मी आज ठाण्याला जातोय. सभेचं नावच उत्तर सभा आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नाची घरी गडबड आहे. पण साहेबांनी मला यायला सांगितलं आहे. त्यामुळे मी आलोय. – वसंत मोरे

Apr 12, 2022, 06:57 PMIST

जम्मू काश्मीर मध्ये राज ठाकरेंच्या सभेचं प्रक्षेपण!

जम्मूमध्ये देखील राज ठाकरेंच्या सभेचं प्रक्षेपण केलं जाणार असून त्यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

    शेअर करा