मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी म्हणजे मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्यक असते. भारतात सुमारे १० कोटी मधुमेही आहेत आणि सुमारे २५ ते ४० टक्के लोकांनी मूत्रपिंडाचा विकार होण्याची शक्यता आहे. मूत्रपिंडामध्ये नेफ्रॉन नावाची युनिट्स असतात. अशी कोट्यवधी युनिट्स मूत्रपिंडात असतात. फिल्टरेशन म्हणजे गाळणी हे या युनिटचे मुख्य काम असते. नेफ्रॉन्समध्ये दाब वाढला तर मूत्रपिंडाला जास्त काम करावे लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, रक्तदाब वाढला तर हा दाब सुद्धा वाढतो. युरिन-अल्बुमिन-क्रिएटिनिन रेश्यो या चाचणीने हा दाब कळू शकतो. ही चाचणी प्रत्येक मधुमेहीने वर्षातून एकदा केली पाहिजे. या चाचणीमुळे मूत्रपिंडातील विकाराचे लवकर निदान होऊ शकते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढणे आणि उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतो आणि मूत्रपिंडाचा आजार होतो. मूत्रपिंडाच्या युरिन-अल्बिमिन-क्रिएटिनिन रेश्यो आणि ईजीएफआर (eGFR) या दोन चाचण्या असतात. ईजीएफआरसाठी सीरम-क्रिॲटिनिनची चाचणी लागते. ईजीएफआर ६० पेक्षा कमी असेल तर क्रॉनिक किडनीचा आजार (मूत्रिपिंडाचा गंभीर आजार) झालेला आहे, असे समजते. युरिन-अल्बुमिन-क्रिएटिनिन रेश्यो ३० च्या वर दोन वेळा गेला तर क्रॉनिक किडनीचा आजार होऊ शकतो. म्हणून दर वर्षी मूत्रपिंडाच्या या दोन्ही चाचण्या करणे आवश्यक आहे.