मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भाई असेल इतरांचा, माझ्यासाठी फक्त 'जान'; निखतच्या वक्तव्यावर सलमान म्हणाला...

भाई असेल इतरांचा, माझ्यासाठी फक्त 'जान'; निखतच्या वक्तव्यावर सलमान म्हणाला...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 21, 2022 02:46 PM IST

ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे आणि त्यानंतर मुंबईत जाऊन सलमानची भेट घेणं, हे आपलं स्वप्न असल्याचेही निखत झरीनने मुलाखतीत म्हटलं आहे.

सलमान खान आणि निखत झरीन
सलमान खान आणि निखत झरीन

भारतीय महिला बॉक्सर निखत झरीनने गुरुवारी इस्तांबूल इथं झालेल्या महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५२ किलो वजनी गटात विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर आपण बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची खूप मोठी चाहती असल्याचे निखतने सांगितले होते. यानंतर सलमाननेही तिला ट्विट करत तिच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 

निखतने एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा उल्लेख झाला. झरीनने यावेळी सलमान खान हा आपला आवडता अभिनेता असल्याचे सांगितले. तसेच, “सलमान हा दुसऱ्या लोकांसाठी भाई असेल, माझ्यासाठी तर तो माझी जान आहे, असे निखत म्हणाली. सोबतच सलमानला एकदा भेटण्याची इच्छाही निखतने यावेळी बोलून दाखवली. ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे आणि त्यानंतर मुंबईत जाऊन सलमानची भेट घेणं, हे आपलं स्वप्न असल्याचेही निखत झरीनने मुलाखतीत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, या मुलाखतीचा व्हिडिओ पाहून सुपरस्टार सलमान खानने त्यावर कमेंट करत लिहिले आहे की, ‘सुवर्ण पदकासाठी शुभेच्छा...निखत झरीन’

सलमानची प्रतिक्रिया पाहून निखतनेही यावर ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “ एक डाय हार्ड फॅन असल्या कारणाने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, सलमान कधी माझ्यासाठी ट्विट करेल, यावर माझा विश्वासच बसत नाही, मी अत्यंत नम्र असून माझा विजय हा आणखीन खास बनवल्याबद्दल धन्यवाद!  हा क्षण मी कायम माझ्या ह्रदयात ठेवीन.”

यावर सलमानने परत ट्विट केले आणि म्हटले की, “ फक्त मला मारू नकोस, खूप सारे प्रेम... जे काही करत आहेस ते असेच करत राहा आणि माझा हिरो सिल्वेस्टर स्टेलोनसारखे पंच मारत रहा.”

दरम्यान, भारतीय महिला बॉक्सर निखत झरीनने गुरुवारी इस्तांबूल इथं झालेल्या महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५२ किलो वजनी गटात विजेतेपद पटकावलं होतं. तिने अंतिम सामन्यात थायलंडच्या जितपोंग जुटामस हिला ५-० ने पराभूत केलं. वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली. निखत झरीनने थायलंडच्या जितपोंगविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला होता.

WhatsApp channel