मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: रोहितनं विचारलं पर्थमध्ये राहून भारताकडून कसं खेळणार? ११ वर्षीय क्रिकेटरनं दिलं उत्तर

Rohit Sharma: रोहितनं विचारलं पर्थमध्ये राहून भारताकडून कसं खेळणार? ११ वर्षीय क्रिकेटरनं दिलं उत्तर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 16, 2022 02:33 PM IST

Rohit Sharma - Drushil Chauhan T20 World Cup -: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची नजर द्रुशील चौहान नावाच्या ११ वर्षीय गोलंदाजावर पडली. त्यानंतर भारतीय कर्णधाराने त्या लहान गोलंदाजाला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बोलावले आणि नंतर नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले. रोहित ११ वर्षीय गोलंदाजाचा फॅन झाला आहे.

Rohit Sharm - Drushil Chauhan
Rohit Sharm - Drushil Chauhan

ऑस्ट्रेलियन भूमीवर T20 विश्वचषक २०२२ चा थरार आजपासून (१६ ऑक्टोबर) सुरू झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. दोन्ही संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जाणार आहे.

टीम इंडिया सध्या या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये सराव सामने खेळायचे आहेत. त्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडूंनी पर्थमध्ये एका सराव सत्रात भाग घेतला. या ठिकाणी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला एक नवीन मित्र सापडला आहे. विशेष म्हणजे रोहित या मित्राच्या क्रिकेट गुणांचा चाहता बनला आहे.

बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ११ वर्षीय द्रुशील चौहानविषयी सांगण्यात आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने द्रुशीलला पर्थमधील वाका मैदानावर खेळताना पाहिले, तेव्हा तो त्याच्या गोलंदाजीचा चाहता झाला.

रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे इतर खेळाडू ड्रेसिंग रुममधून बाहेर आले आणि त्याची गोलंदाजी पाहू लागले. नंतर रोहितने त्याला भेटण्यासाठी बोलावले, एवढेच नाही तर रोहित शर्माने द्रुशीलला नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधीदेखील दिली.

द्रुशीलने नेटमध्ये कर्णधार रोहित शर्माला गोलंदाजी केली, तसेच टीम इंडियाच्या इतर खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफची भेट घेतली. द्रुशीलने सांगितले की, इनस्विंग यॉर्कर हा त्याचा आवडता चेंडू आहे, तो हा चेंडू टाकण्यासाठी सतत प्रयत्न करतो.

रोहित शर्माने नंतर द्रुशिलला ऑटोग्राफ दिला, तसेच त्याच्याशी मजा मस्ती केली. यावेळी रोहितने त्याला विचारले की, तु येथे पर्थमध्येच राहिलास तर भारतासाठी कसे खेळणार? यावर द्रुशिल म्हणाला की तो भारतात येणार आहे, पण तो कधी येईल हे त्याला माहीत नाही.

दरम्यान, टीम इंडिया 7 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला पोहोचली होती, जिथे टीम इंडियाला दोन अनौपचारिक आणि दोन अधिकृत सराव सामने खेळायचे आहेत. यानंतर 23 ऑक्टोबरपासून पाकिस्तानविरुद्ध मिशन वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या