IPL 2023: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ८ विकेट्स राखून हैदराबादचा पराभव केला. मात्र, या सामन्यात हैदराबादच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा जम्मू-काश्मीरचा युवा फलंदाज विव्रांत शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १९८ धावांचा आकडा गाठला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावून विव्रांत शर्माने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
हैदराबादविरुद्ध खेळण्यात आलेला सामना मुंबईच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा होता. कोणत्याही परिस्थितीत मुंबईच्या संघाला हा सामना जिंकायचा होता. दुसरीकडे आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या हैदराबादचा हा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करायचा होता. हैदराबादकडून सलामी देण्यासाठी मैदानात उतरलेल्या विव्रांत शर्माने ३६ चेंडूत अर्धशतक झळकावून हैदराबादच्या संघाची भूमिका स्पष्ट केली. त्याने ४७ चेंडूत ६९ धावा केल्या. ज्यात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह विव्रांत शर्माच्या नावावर पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. हा विक्रम स्वप्नील अस्रोडकर याच्या नावावर होता. त्याने १५ वर्षांपूर्वी पदार्पणाच्या सामन्यात ६० धावांची खेळी केली होती.
आयपीएल २०२३ च्या लिलावात हैदराबादच्या संघाने विव्रांत शर्मावर २.६० कोटींची बोली लावली होती. परंतु, त्याला हैदराबादच्या शेवटच्या सामन्यात संधी मिळाली. मात्र, या संधीचे सोन करत त्याने आपली क्षमता जगाला दाखवून दिली. आयपीएलच्या पुढच्या हंगामात विव्रांतचा प्लेईंग इलेव्हन समावेश केला जाईल, असा विश्वास आहे.
विव्रांत शर्मा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने २०२१ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही स्वरुपाचे क्रिकेट सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत ९ सामन्यात दोन अर्धशतकाच्या मदतीने १९१ धावा केल्या आहेत. तर, तीन डावात सहा विकेट्स घेतल्या. तसेच १३ धावांत चार विकेट्स घेणे, ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
विव्रांतने १४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ५१९ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर, आठ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये २२ धावांत चार विकेट घेणे, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ७६ धावा केल्या आहेत आणि एक विकेट घेतली आहे.