मराठी बातम्या  /  क्रीडा  /  U19 World Cup: अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारताच्या लेकींसाठी जय शाहांची मोठी घोषणा

U19 World Cup: अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारताच्या लेकींसाठी जय शाहांची मोठी घोषणा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 09:34 AM IST

Jay Shah: दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय मुलींसाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

Jay Shah
Jay Shah

U19 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने धुव्वा उडवत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली. या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

“भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे. या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे”, असं जय शाह यांनी ट्वीट केले आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तितास साधू, अर्चना देवी आणि पर्शावी चोप्रा यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ६८ धावांवर आटोपला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १४व्या षटकातच विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले. या सामन्यात तितास साधूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

WhatsApp channel

विभाग