मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS NZ : पुन्हा न्यूझीलंड! आधी क्रिकेट, आता हॉकी... किवींनी भारताला अनेकदा स्पर्धेतून बाहेर काढलं

IND VS NZ : पुन्हा न्यूझीलंड! आधी क्रिकेट, आता हॉकी... किवींनी भारताला अनेकदा स्पर्धेतून बाहेर काढलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 23, 2023 11:14 AM IST

hockey ind vs nz : हॉकी विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शूटआऊटमधील या पराभवाने करोडो भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले आहे. तसं पाहिलं तर न्यूझीलंड नेहमीच भारताला मोठ्या सामन्यांमध्ये पराभूत करत आला आहे.

IND VS NZ
IND VS NZ

टीम इंडिया हॉकी वर्ल्ड कप २०२३ मधून बाहेर पडली आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर रविवारी (२२ जानेवारी) क्रॉसओव्हर सामन्यात भारताला पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडकडून ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. १९७५ मध्ये भारताने शेवटचा आणि एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता. तसं पाहिलं तर मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड भारताला नेहमीच धक्का देत आला आहे.

२०१९ वनडे वर्ल्डकप सेमी फायनल

क्रिकेट असो की हॉकी, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने भारताचा अनेकदा पराभव केला आहे. यामध्ये २०१९ च्या वनडे वर्ल्डकपमधील सामना कोण विसरू शकेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जबरदस्त खेळ दाखवत त्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. भारत न्यूझीलंडवर मात करू शकेल, अशी चाहत्यांना आशा होती. पण अपेक्षेविरुद्ध घडले. मँचेस्टरमध्ये झालेल्या त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले. येथेही किवींनी भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. २०२१ साली इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे हा अंतिम सामना खेळला गेला होता.

२००० सालची चॅम्पियन्स ट्रॉफी

२००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नॉक आउट राउंडमध्येही न्यूझीलंडने भारताला धक्का दिला होता. नैरोबी येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार सौरव गांगुलीच्या ११७ आणि सचिन तेंडुलकरच्या ६९ धावांच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा करून अडचणीत सापडला होता. पण, अष्टपैलू ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा करत किवी संघाला ४ गडी आणि २ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

यानंतर २०२१ टी-२० वर्ल्डकपमध्येही न्यूझीलंडने भारताला धुळ चारली होती. त्याआधी २०१६ आणि २००७ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. इतकेच नाही तर १९७५, १९७९, १९९२ आणि १९९९ च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघ न्यूझीलंडकडून हरला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील हा सातवा सामना होता. याआधी दोन्ही देशांदरम्यान ६ सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन आणि किवी संघाने दोन जिंकले. यादरम्यान १९८६ आणि २००२ च्या विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा २-१ ने पराभव केला होता. त्याच वेळी, भारतीय संघ १९९८ च्या विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा आणि १९८२ च्या विश्वचषकात किवींविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. तर १९७३ च्या विश्वचषकात दोन्ही संघांमधील सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या