मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cristiano Ronaldo: रोनाल्डोला सौदीच्या 'या' क्लबकडून १८०० कोटींची ऑफर, तासाला किती लाख कमावणार? पाहा

Cristiano Ronaldo: रोनाल्डोला सौदीच्या 'या' क्लबकडून १८०० कोटींची ऑफर, तासाला किती लाख कमावणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 28, 2022 10:02 PM IST

Cristiano Ronaldo offer from Saudi Arabian team Al Nassr: ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या कोणत्याही क्लबचा भाग नाही. त्याने मँचेस्टर युनायटेडशी संबंध तोडले आहेत. आता सौदी अरेबियातील एका क्लबने त्याला मोठी ऑफर दिली आहे.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo

पोर्तुगालचा कर्णधार आणि फुटबॉल जगतातला सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोला १८ अब्ज रुपयांची (१८०० कोटी) ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाच्या अल नसर एफसीने रोनाल्डोला ही ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल नसर क्लबला रोनाल्डोसोबत ३ वर्षांचा करार करायचा आहे. म्हणजेच दरवर्षी हा क्लब रोनाल्डोला ६ अब्ज रुपये (६०० कोटी) देण्यास तयार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार फुटबॉलर रोनाल्डो आणि क्लबमध्ये काही महिन्यांपूर्वीच या कराराची चर्चा सुरू झाली होती. सौदी अरेबियाच्या क्लबने रोनाल्डोला दिलेल्या ऑफरनुसार, रोनाल्डो एका दिवसात १.६७ कोटी रुपये कमवेल. तर प्रत्येक तासाला रोनाल्डोची कमाई ७ लाख रुपये असणार आहे. तसेच, या करारानुसार, रोनाल्डोची दर मिनिटाची कमाई सुमारे ११ हजार ६४६ रुपये असेल. या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर रोनाल्डोला प्रत्येक सेकंदाला १९४ रुपये मिळतील.

दरम्यान, रोनाल्डोने फिफा विश्वचषक २०२२ सुरू असतानाच मँचेस्टर युनायटेड सोडले होते. रोनाल्डो आता ३७ वर्षांचा आहे. अलीकडच्या काही दिवसांत, क्रिस्टियानो रोनाल्डोने पियर्स मॉर्गनला एक स्फोटक मुलाखत दिली होती. यामध्ये रोनाल्डोने अनेक मुद्द्यांवरून मँचेस्टर युनायटेड क्लबवर टीका केली होती. यानंतर मँचेस्टर युनायटेडने एक निवेदन जारी केले आणि रोनाल्डो आणि क्लबचा संबंध संपल्याचे जाहीर केले.

३७ वर्षीय रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसाठी ३४६ सामन्यांत १४५ गोल केले आहेत. तो या क्लबकडून दोनदा खेळला आहे. २००९ मध्ये त्याने पहिल्यांदा क्लब सोडला आणि रिअल माद्रिदमध्ये सामील झाला. यानंतर, त्याने स्पॅनिश क्लब माद्रिदकडून खेळताना सर्व यश मिळवले. यादरम्यान, तो ५ वेळा बॅलन डी'ओर विजेता देखील होता. माद्रिदनंतर, रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंटसमध्ये सामील झाला आणि ३ वर्षे या क्लबसाठी खेळला. यानंतर रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला होता.

रोनाल्डो सध्या फिफा विश्वचषक खेळत आहे. त्याचा हा पाचवा विश्वचषक आहे. त्याने आतापर्यंत सर्व विश्वचषकात गोल केले आहेत. दरम्यान, लिओनेल मेस्सीही फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेन सोडू शकतो, अशी बातमी आहे. मेस्सी आणि रोनाल्डो दोघेही त्यांच्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या