मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Women’s Premier League: महिला आयपीएलमधील पाच फ्रँचायझींचे मालकी हक्क मिळणाऱ्या कंपन्यांची नावे समोर

Women’s Premier League: महिला आयपीएलमधील पाच फ्रँचायझींचे मालकी हक्क मिळणाऱ्या कंपन्यांची नावे समोर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 25, 2023 04:56 PM IST

Women's IPL: आगामी महिला आयपीएलच्या पाच फ्रंचायझींचे मालकी हक्क मिळवण्यासाठी देशातील नावाजलेल्या कंपन्यांकडून तब्बल ४६६९.९९ कोटींची बोली लावण्यात आली आहे.

Womens IPL
Womens IPL

Women's Premier League: मुंबईत आज (२५ जानेवारी २०२३) महिला आयपीएलचे ऑक्शन पार पडले. या ऑक्शनमध्ये अदानी, इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड,जेएसडब्लू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आगामी महिला आयपीएलमधील पाच संघाचे मालकी हक्क मिळवले. यासाठी तब्बल ४६६९.९९ कोटींची बोली लावण्यात आली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण पाच संघ सहभागी होणार आहेत. ज्यात, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनौचा समावेश करण्यात आला आहे. महिला आयपीएलचे नाव बदलून महिला प्रीमिअर लीग असे ठेवण्यात आले आहे.

अहमदाबाद संघाचे मालकी हक्क मिळवण्यासाठी अदानीने १ हजार २८९ कोटींची सर्वात मोठी बोली लावली. अहमदाबादचा संघ महिला आयपीएलमधील सर्वात महागडा संघ ठरला आहे. याशिवाय, रिलायन्स समूहाच्या मालकीच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबई फ्रँचायझी ९१२.९९ कोटी रुपयांना विकत घेतली. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने बंगळुरू फ्रँचायझी ९०१ कोटी रुपयांची बोली लावली. जेएसडब्लू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली फ्रँचायझी ८१० कोटी रुपयांना विकत घेतली. तर, कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने लखनऊ फ्रंचायझीसाठी ७५७ कोटी मोजले.

 

पुरूष आयपीएलच्या पहिल्या हंगामात ८ संघाचे मालकी हक्क मिळवण्यासाठी ७२३.५९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५९०५ कोटींची बोली लागली होती. २००८ मध्ये अमेरिकन डॉलरचे मूल्य ४४ रुपये इतके होते. त्यानुसार २००८ मध्ये पुरुषांच्या आयपीएलमधील ८ संघांची सुमारे ३१८५ कोटी रुपयांत विक्री झाली होती.

महिला आयपीएलच्या ऑक्शननंतर भारतीय निमायक मंडाळाचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले. "आजचा दिवस क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस आहे, महिला आयपीएलमधील पाच संघाचे मालकी हक्क मिळवण्यासाठी २००८ मध्ये पुरुषांच्या पहिल्या हंगामापेक्षा जास्त बोली लागली. विजेत्यांची अभिनंदन. आम्ही बोलीमध्ये एकूण ४६६९.९९ कोटी रुपये मिळवले. महिला क्रिकेटमधील क्रांतीची ही सुरुवात आहे", अशी जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

WhatsApp channel

विभाग