मराठी बातम्या  /  Religion  /  Why Oil Offered To Shani Dev

Shani Dev : शनिला का अर्पण केलं जातं तेल?, काय आहे त्यामागची कहाणी?

शनिदेव
शनिदेव (हिंदुस्तान टाइम्स)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 20, 2023 06:50 AM IST

Shani Oil Offering Importance : शनिवारी शनिमंदिरात जाऊन किंवा हनुमानाच्या देवळात जाऊन तेल अर्पण केलं जातं. मात्र शनिला तेल वाहाण्यामागे काय कहाणी आहे हे आपल्याला ठावूक आहे का?

शनि ही न्यायप्रिय देवता आहे. शनिचा प्रकोप रावाचा रंक करते आणि शनिची कृपा रंकाचा राव करते. अशात दर शनिवारी शनिला तेल वाहाणाऱ्यांची संख्या अत्यंत मोठी असते. शनिवार हा दिवस शनिला समर्पित दिवस म्हणून मानला जातो. शनिवारी शनिमंदिरात जाऊन किंवा हनुमानाच्या देवळात जाऊन तेल अर्पण केलं जातं. मात्र शनिला तेल वाहाण्यामागे काय कहाणी आहे हे आपल्याला ठावूक आहे का?

ट्रेंडिंग न्यूज

यामागी कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला रामायणाच्या काळात जावं लागेल. त्यावेळेस सर्व विद्यांनी विभूषित असणाऱ्या रावणाला गर्वाची बाधा झाली होती. आपल्या अहंकाराने त्याने सर्व देवांना बंदी बनवलं होतं. शनिवर त्याचा खूप राग होता म्हणून, त्यानं शनिला उलटं लटकवलं होतं. त्या उलट्या लटकावण्याने शनिच्या अंगाची लाही होत होती.

जेव्हा हनुमान रावणाच्या दरबारात आणला गेला, तेव्हा अंहंकारी रावणाने हनुमानाच्या शेपटाला आग लावली होती. मात्र हनुमानाने त्याच शेपटाने संपूर्ण लंका जाळून खाक केली आणि सर्व देवता रावणाच्या कैदेतून मुक्त झाले.

शनिदेवांच्या अंगाची होत असलेली लाही लक्षात घेत हनुमानाने शनिदेवांच्या अंगावर तेल चोळले होते. त्यांच्या या कृतीने प्रसन्न होत शनिदेवांनी त्यांना हवा तो वर मागण्यास सांगितलं. त्यावेळेस हनुमानाने जो कोणी भक्त तुमच्या क्रोधाचा बळी असेल आणि त्याने माझी आराधना केल्यास तुम्ही त्यावरची वक्रदृष्टी नाहीशी कराल असा वर मागितला.

त्यांच्या या बोलण्याने संतुष्ट होत शनिदेवांनी मारूतीला सांगितलं की, ज्या भक्तावर माझी अवकृपा असेल आणि त्याने तुमची आराधना केल्यास तो माझ्या प्रकोपातून मुक्त होईल. जो व्यक्ती शनिवारी माझीही आराधना करेल आणि मला तेल अर्पण करेल. ती व्यक्तीही सर्व संकटातून मुक्त होईल.

आज शनिवार आहे. तुम्हाला शनिच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर आज शनिदेवांना किंवा मारूतीला तेल अवश्य अर्पण करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

WhatsApp channel