मराठी बातम्या  /  धर्म  /  Jwalamukhi Mandir : कुठे आहे ज्वालामुखी मंदिर?; दोन हजारच्या शेकडो नोटा तिथं अचानक आल्या कुठून?

Jwalamukhi Mandir : कुठे आहे ज्वालामुखी मंदिर?; दोन हजारच्या शेकडो नोटा तिथं अचानक आल्या कुठून?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 24, 2023 09:03 AM IST

Jwalamukhi Mandir : हिमाचल प्रदेशातल्या कांगडा इथल्या ज्वालामुखी मातेच्या मंदिरात २० मे रोजी म्हणजे दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या एका दिवसानंतर अज्ञात व्यक्तीने दोन हजार रूपयाच्या तब्बल चारशे नोटा म्हणजे आठ लाख रूपये ज्वालामुखी मातेच्या चरणी अर्पण केले आहेत.

ज्वालामुखी मंदिर, कांगडा, हिमाचल प्रदेश
ज्वालामुखी मंदिर, कांगडा, हिमाचल प्रदेश (HT)

दोन हजारांच्या नोटा आणि त्यावर सरकारने आणलेली बंदी आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे हाल या बातम्या अगदी रोज आपण पाहातो. केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात उचललेलं हे पाऊल आहे असं सांगितलं जात आहे. मात्र रोजचा काम करणारा कष्टकरी यात नोटबंदीत कसा होरपळून निघतोय हे अवघा देश पाहात असताना हिमाचल प्रदेशातल्या कांगडा इथनं एक अवाक करणारी गोष्ट पाहायला मिळाली आहे.

हिमाचल प्रदेशातल्या कांगडा इथं ज्वालामुखी मातेचं मंदिर आहे. या मंदिरातली ज्योत गेली कित्येक दशकं अखंड प्रज्वलीत असलेली पाहायला मिळतेय. इथं येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. 

दोन हजारांच्या नोटा १९ मे २०२३ पासून चलनातून बाद करण्यात येतील अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केली होती. अगदी दुकानदारही या नोटा चलनातून बाद होणार असल्यामुळे ग्राहकांकडून घेणे नाकारत होते. 

अज्ञाताने अर्पण केल्या तब्बल ४०० नोटा

सरकारने या नोटा बँकेत जमा करा आणि त्याला ३० सप्टेंबरपर्यंत अवधी असल्याचं सांगितलं आहे. सहाजिकच या नोटा बदलून घेण्यासाठी देशभरात बँकांमध्ये रीघ असलेली पाहायला मिळत आहे. कांगडा इथल्या ज्वालामुखी मातेच्या मंदिरात २० मे रोजी म्हणजे दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या एका दिवसानंतर अज्ञात व्यक्तीने दोन हजार रूपयाच्या तब्बल चारशे नोटा म्हणजे आठ लाख रूपये ज्वालामुखी मातेच्या चरणी अर्पण केले आहेत.

इतक्या नोटा पाहून मंदिर प्रशासनही अवाक

इतक्या दोन हजाराच्या नोटा पाहून मंदिर प्रशासनही अवाक झालं आहे. मात्र अद्यापही दोन हजारांच्या नोटा बँक स्वीकारत असल्याने या नोटा बँकेत जमा करून त्यातून मिळणारा निधी हा भक्तांच्या सेवेकरीता वापरणार असल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यासोबतच मंदिराच्या विकास कामात या निधीची भर पडली असल्याचंही मंदिराचे कनिष्ठ अभियंता सुरेश कुमार यांनी सांगितलं आहे.

WhatsApp channel

विभाग