भारतात एक मंदिर असं आहे ज्याचे खांब चक्क गातात असं सांगितलं तर तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहाणार नाही. भारतातल्या देवळांबद्दल खूप कथा प्रसिद्ध आहेत. अनेक देवळांना उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमूना म्हणूनही पाहिलं जातं. काही मंदिरांचे इतिहास अंगावर काटा आणतात, तर काही मंदिरांच्या गूढकथा आपल्याला हात जोडायला भाग पाडतात. काही देवळांची उत्तम कलाकुसर आपल्याला तोंडात बोटं घालायला भाग पाडते.
आज आपण अशा एका मंदिराबद्दल बोलणार आहोत ज्या मंदिरात आजही सात सूर ऐकायला मिळतात. इथले खांब चक्क सात सूर गातात. याच अनोख्या मंदिराबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
कर्नाटकातील हम्पीमध्येही तुम्हाला अशीच काही रहस्ये पाहायला मिळतील. येथील विठ्ठल मंदिर अनोख्या कलेचा नमुना सादर करते.
हम्पी इथलं हे विठ्ठल मंदिर १५ व्या शतकात बांधले गेले. भगवान विठ्ठलाला समर्पित हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या देवराया द्वितीय यांनी बांधले होते. त्यामुळेच या मंदिराला विजय विठ्ठल मंदिर असेही म्हणतात. इथला विठ्ठल भगवान विष्णू विठ्ठल नावाने ओळखला जातो.
हम्पीच्या या मंदिराला पाहून किती कल्पकतेनं हे मंदिर बांधलं असावं याचा अंदाज येतो. या मंदिरात एकंदरीत ५६ खांब आहेत. या खांबांना सारेगम खांब म्हणूनही ओळखलं जातं. हे खांब वर जाऊन मंदिराच्या छताला आधार देतात. या खांबांचं वैशिष्ट्य म्हणजे या खांबांमधून सात सूर म्हणजेच ‘सा,रे,ग,म,प,ध,नी’ हे सूर ऐकू येतात. प्रत्येक खांबातून याच सात सूरांची सुरावट ऐकायला मिळते. चंदनाच्या एका काठीने या खांबांना स्पर्श केला असता आजही हे सात सूर आपल्या कानांना सुखावतात. यावरूनच या मंदिराची रचना करताना किती बारीकसारीक गोष्टींचा तेव्हाच्या वास्तुरचनाकारांनी अभ्यास केला असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. संगीत हे भारतीय संस्कृतीचा प्राण आहे असं म्हटलं जातं. अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक मियां तानसेन आपल्या गायनाने दीप प्रज्वलीत करत असे असं इतिहास सांगतो. मात्र हे वास्तुरचनाकार आपल्यासाठी इतिहासातून वर्तमानासाठी एक अनोखा सांगितिक ठेवा ठेवून गेले आहेत. आजही या देवळातले खांब आपल्यासाठी गातात हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. तेव्हा हम्पीच्या या विठ्ठलाच्या देवळाला नक्की भेट द्या.
संबंधित बातम्या