शंख हे माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे. शंखाचा नादही सर्व पीडा किंवा कष्ट दूर करणारा आहे. देवघरात शंखालाही अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. भगवान श्रीविष्णू यांच्या हातीही शंख पुराणकथांमध्ये पाहायला मिळतो. देवघरातल्या शंखाची पूजा कशी करावी याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
प्रत्येक गोष्टीची पूजा करण्याचे काही नियम असतात. शंखाची पूजा करण्याचाही नियम आहे. आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर एका पात्रात शंखाला दूध,मध, गंगाजल इत्यादींनी आंघोळ घालावी.त्यानंतर त्या शंखाला पुन्हा गंगाजलाने धुवून घ्यावे. त्याला फुलं, चंदन, केशर अर्पण करावं. त्यानंतर शंखाला धूप दाखवावं. तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडावेत आणि शंखाचं ध्यान करावं.
आरतीनंतर पूजेच्या वेळी शंखात ठेवलेले पाणी घरभर शिंपडावं. त्यानं घरात सकारात्मकता येते. घरातल्या सदस्यांवर हे पाणी शिंपडल्यास शारीरिक आणि मानसिक विकारांपासून आराम मिळतो असं सांगितलं जातं.
शंखाच्या आत कधीही पाणी ठेवू नये. शंख जमीनीवरही ठेवू नये. शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर ठेवावा. पुजेच्या ठिकाणी शंख ठेवताना त्याचं मुख खालच्या बाजूस आणि उघडा भाग वरच्या दिशेने ठेवावा. शंख नेहमी भगवान श्रीविष्णू, लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा.
जर तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला १०८ तांदुळांनी शंखाला लाल कपड्यात गुंडाळावं आणि या शंखाला तिजोरीत स्थापित करावं. असं केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारते असं सांगितलं जातं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या