मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गुजरात दंगलीवरील बीबीसीचा माहितीपट यूट्यूब, ट्विटवरून ब्लॉक; मोदी सरकारच्या आदेशानंतर कारवाई

गुजरात दंगलीवरील बीबीसीचा माहितीपट यूट्यूब, ट्विटवरून ब्लॉक; मोदी सरकारच्या आदेशानंतर कारवाई

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 21, 2023 07:50 PM IST

BBC Documentary On Gujarat Riots : गुजरात दंगलीवर बीबीसीनं एक माहितीपट प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं या माहितीपटाला यूट्यूबसह ट्विटरवरून ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

BBC Documentary On 2002 Gujarat Riots
BBC Documentary On 2002 Gujarat Riots (HT)

BBC Documentary On 2002 Gujarat Riots : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर 'इंडिया- द मोदी क्वेशन' नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला आहे. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं बीबीसीच्या या माहितीपटावर यूट्यूबसह ट्विटरवरही बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या काळात तात्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर बीबीसीनं माहितीपटातून प्रपोगंडा दाखवल्याचा आरोप करत सरकारनं भारतात त्याच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.

गोध्रामधील रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमधील अनेक भागांमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत राजकीय नेते, पत्रकार, दंगलीत प्राण गमावलेल्यांचे नातेवाईक आणि तुरुंगात असलेले पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या मुलीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. गुजरात दंगलीत निष्पाप लोकांचा जीव जात असताना तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका संशयास्पद होती, अशा प्रकारचं चित्रण बीबीसीच्या माहितीपटात करण्यात आलं आहे. त्यानंतर या माहितीपटावरून भाजपनं बीबीसीवर टीका केली असून केंद्रातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं बीबीसीचा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकारनं यूट्यूबसह माहितीपटाची लिंक असलेल्या ५० हून अधिक ट्विट्सला ब्लॉक करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर यूट्यूब आणि ट्विटरनं तातडीनं कार्यवाही करत माहितीपटाच्या लिंक्स ब्लॉक केल्या आहेत. बीबीसीनं तयार केलेली 'इंडिया- द मोदी क्वेशन' डॉक्यूमेंटरी दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारनं माहितीपटाला ब्लॉक करण्याचा आदेश काढल्यामुळं त्याला भारतात पाहता येणार नाही.

IPL_Entry_Point