मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून झाले 'डॉक्टर' एकनाथ शिंदे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईस्थित डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाकडून डीलीट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (Eknath Shinde conferred an honorary Doctor of Literature)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता यापुढे डॉक्टर एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जाणार आहेत. नवी मुंबईस्थित डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाकडून एकनाथ शिंदे यांना आज झालेल्या दीक्षांत समारंभात डीलीट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डीलीट पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.
ट्रेंडिंग न्यूज
कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचे कौतुक
नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी माजी खासदार विजय दर्डा यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी. लिट) देण्यात आली.
कोरोना काळात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदतीसोबतच रेमडेसीवीर आणि इतर औषधे मिळावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. कोरोना काळात शिंदे यांनी लोकांमध्ये जाऊन अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय वैद्यकीय सोयी सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, रुग्णालयातील बेडस, रुग्णवाहिका वेळेत मिळाव्यात यासाठी देखील प्रयत्न केले होते.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळ येथील महापूर, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य, कोल्हापूर आणि महाड येथे आलेल्या महापुराच्यावेळी केलेले मदतकार्य अशा अनेक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ‘विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे ही आनंदाची बाब आहे. येथील विद्यार्थी जगातील कोणत्याही देशात जाऊन मानवाला निरोगी ठेवण्याचे काम करतील. आज बालरुग्ण आणि प्रौढ रूग्णांच्या पद्धतशीर थेरपीची नितांत गरज आहे, हे लक्षात घेऊन डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील नवीन कॅथ लॅबमध्ये आधुनिक सुविधांसह वैद्यकीय - विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता निर्माण केली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.’
यावेळी डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र कुलपती शिवानी पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा चतुर्वेदी आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या