शेगांव : पंढरपूर येथून दर्शन घेऊन परत येत असणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असतांना ही दुर्दैवी घटना घडली. शेगांवजवळ असणाऱ्या एका स्वागत कमानीला त्यांची क्रूझर गाडी ही आज सकाळी ६ च्या सुमारास धडकली. यात तीन भाविक ठार तर सात जण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी काही भाविक गेले होते. हे भाविक परत येत होते. दरम्यान, घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असतांना शेगावजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या स्वागत कमानीला त्यांची क्रुझर गाडी ही धडकली. या अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले आहेत. तर ७ भाविक गंभीर जखमी झाले.
या आपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्वांना जवळील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात उपचारांसाठी दाखल केले. यात तीन भविकांचा मृत्यू झाला. तर काही जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अकोल्यात पाठवण्यात आले.
दरम्यान हा अपघात वाहनचालकाला झोप लागल्याने झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रात्रभर प्रवास करून हे भाविक घरी पोहोचण्याच्या बेतात होते. विठुरायाच्या दर्शन घेऊन परत येत असतांना अवघ्या काही अंतरावर त्यांचे घर राहिले असतांना घरी पोहोचायच्या काही वेळ आधी काळाने त्यांच्यावर घाला घातला.