मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandni chowk flyover demolished :चांदणी चौकातील पूल इतिहास जमा; ६०० किलो स्फोटके वापरुनही अखेर जेसीबीच्या साह्याने पाडला पूल

Chandni chowk flyover demolished :चांदणी चौकातील पूल इतिहास जमा; ६०० किलो स्फोटके वापरुनही अखेर जेसीबीच्या साह्याने पाडला पूल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 02, 2022 02:27 AM IST

Chandni chowk flyover demolished : चांदणीचौकातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी येथील उड्डाणपूल अखेर आज १ वाजता पाडण्यात आला. ६०० किलो स्फोटके वापरूनही पूल पूर्ण न पडल्याने अखेर जेसीबीच्या साह्याने हा पूल पूर्ण पाडण्यात आला.

Chandni chowk flyover demolished
Chandni chowk flyover demolished

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणीचौकातील वाहतूक कोंडीत अडकल्यावर येथील उड्डाण पूल पाडण्याचे प्रशासनाने ठरवले होते. तब्बल महिन्याभरच्या तयारी नंतर रविवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास तब्बल ६०० किलो स्फोटके वापरुन हा पूल अखेर पाडण्यात आला. १९९५ मध्ये बांधण्यात आलेल्या पूल अखेर आज इतिहासात जमा झाला. ६०० किलो स्फोटके वापरूनही पूल पूर्ण पडला नसल्याने अखेर जेसीबीच्याच साह्याने हा पूल पाडण्यात आला.

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करण्यात आला. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला करण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. बाहेरून येणार्‍या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावण्यात आले होते. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते.

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये, यासाठी तब्बल ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

राडारोडा काढण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यात १६ एक्सकैवेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

केवळ २ सेकंदात असा पाडण्यात आला पूल

पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्रे पाडून त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटके भरली होती. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रित पद्धतीने स्फोट करण्यात आला. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्फोट करण्यात आला.बरोबर रात्री १ वाजता पूल पाडण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आणि १ च्या ठोक्यावर हा पूल स्फोटकांनी पाडण्यात आला. इतके स्फोटके वापरूनही पूल पूर्ण न पडल्याने अखेर जेसीबीच्या साह्याने हा पूल पाडण्यात आला.

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

ईडीफाईस कंपनीचे आनंद शर्मा म्हणाले…

ईडीफाईस कंपनीचे आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे अपेक्षित होते, त्यानुसार ब्लास्ट झालेला आहे. हा मोठा स्फोट आम्हाला कऱ्याचा नव्हता. अपेक्षापेक्षा अधिक स्टील पुलात होते. त्यामुळे संपूर्ण पुलाचा सांगाडा पडला नसल्याचे दिसत आहे. संपूर्ण पुलावरील काँक्रिट हटवले असून केवळ स्टील रॉड राहिलेले आहे. पुढील चार ते पाच तासात जो काही ढिगारा पडला आहे तो हटविण्यात येईल. जेसीबी आणि पोकलेन याच्या साह्याने संपूर्ण खिळखिळा झालेला पुलचा भाग बाजूला करण्यात येईल. दुसरा कोणताही स्फोट याठिकाणी करण्याची गरज नाही. स्टील जाळीचा सांगाडा जमीनदोस्त करून ढिगारा बाजूला करण्यात येत आहे. सदर पूल पडण्याकरीता एकूण १३०० होल्स स्फोटक भरण्यासाठी करण्यात आले होते त्यापैकी काही होल्स मध्ये स्फोटक राहिली आहे का आणि एनडीए बाजूच्या पुलाचे व्यवस्थित स्फोट झाले नसून यासंदर्भात अभियंते तपासणी करण्यात येत आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग