मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी; शिंदे-फडणवीसांचं ट्वीट

Sambhajinagar : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी; शिंदे-फडणवीसांचं ट्वीट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 24, 2023 08:09 PM IST

Aurangabad Osmanabad Renamed : राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar

Aurangabad Osmanabad Renaming : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरास मोदी सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळं यापुढं ही शहरं अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशीव या नावानं ओळखली जाणार आहेत. शहरांची नावं बदलल्यानं हे जिल्हे देखील नव्या नावानंच ओळखले जाणार आहेत.

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव करण्याची मागणी जुनी होती. युती सरकारच्या काळापासून यासाठी प्रयत्न सुरू होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक औरंगाबाद व उस्मानाबादचा उल्लेख संभाजीनगर व धाराशीव असाच करत. पक्षाचं मुखपत्र दैनिक सामनात आजही तसाच उल्लेख केला जातो. १९९५ साली युतीचं सरकार असताना तत्कालीन राज्य मंत्रिमंडळानं या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता.

अलीकडं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनंही याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा हा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडं पाठवला होता. त्यावर आता केंद्रानं मान्यतेची मोहोर उठवली आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासूनची ही मागणी प्रत्यक्षात आली आहे.  

देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील केंद्र सरकारनं पाठवलेलं पत्र ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 'करून दाखवलं' असं फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गमावल्यानंतरही खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. दुसरीकडं, एकनाथ शिंदे हे आपलाच गट खरा शिवसेना आहे हे जनमानसावर ठसविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्याचा प्रस्ताव अलीकडं पक्षाच्या कार्यकारिणीत मंजूर केला आहे. या स्थानकाला सीडी देशमुख यांचं नाव देण्याची शिंदेसेनेची मागणी आहे. आता केंद्रानं औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरास मंजुरी दिल्यानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण केल्याचा दावा त्यांना करता येणार आहे.

IPL_Entry_Point