मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Hindenburg effect : हिंडनबर्ग अहवालाचा फटका! अदानीच्या ‘या’ कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

Hindenburg effect : हिंडनबर्ग अहवालाचा फटका! अदानीच्या ‘या’ कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2023 12:07 PM IST

Hindenburg effect on Adani group Shares : हिंडनबर्गच्या अहवालाचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून अदानी समूहाला त्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

Adani Group Shares
Adani Group Shares

Hindenburg effect on Adani group Shares : 'हिंडनगबर्ग रिसर्च'नं जाहीर केलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटू लागले आहेत. देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर आज धडाधड कोसळले. विविध कंपन्यांचे शेअर ५ ते २० टक्क्यांपर्यंत घसरले. 

'हिंडनबर्ग'नं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी समूहावर शेअरच्या मूल्यांच्या बाबतीत हेराफेरीचा व फसवणुकीचा ठपका ठेवला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारात, विशेषत: अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर झालेला दिसत आहे. अदानीच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरून ट्रेड करत आहेत.

अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक १९.६ टक्के घसरण झाली आहे. सध्या अदानी टोटल गॅसचे शेअर्स १९.३६ टक्क्यांनी घसरून २९५८.८० रुपयांवर व्यवहार करत आहेत. आतापर्यंतच्या व्यवहारात अदानी टोटल गॅसचा समभाग २९३४.५५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

अदानी पॉवर आणि अदानी विल्मरला लोअर सर्किट

अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स शुक्रवारी १६.१६ टक्क्यांनी घसरून २१०५.९५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी पॉवरचे शेअर्स ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह २४८.०५ रुपयांवर आहेत. अदानी विल्मरचे शेअर्स ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह ५१७.३० रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​समभाग ११.०९ टक्के घसरून १६४९.६० रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स ४ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून ६८४ पर्यंत खाली आले आहेत. याशिवाय NDTV चे शेअर्स देखील ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह २५६.३५ रुपयांवर पोहोचले आहेत.

दोन दिवसात २.३७ लाख कोटींचं नुकसान

अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीमुळं समूहाचे बाजार भांडवल अवघ्या २ दिवसांत २.३७ लाख कोटी रुपयांनी घटलं आहे. अदानी समूहाचा सर्वात मौल्यवान स्टॉक असलेल्या अदानी टोटल गॅसच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या २ दिवसांत ७६ हजार कोटींची घट झाली आहे. त्याच वेळी अदानी ट्रान्समिशनचं बाजार भांडवल ६३,७०० कोटी रुपयांनी कमी झालं आहे.

WhatsApp channel

विभाग