एकीकडे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS 1ST ODI) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. त्याच वेळी, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका सातासमुद्रा पार सुरू आहे.
मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ७ जून रोजी इंग्लंडमधील लंडन येथील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल रंगणार आहे.
सध्या न्यूझीलंड आणि श्रीलंका (NZ VS SL TEST) यांच्यातील कसोटी मालिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पहिल्या सामन्याशी संबंधित आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेली एक व्यक्ती दारू पीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात बिअरचा ग्लास आहे. या दरम्यान, डॅरेल मिशेलने मारलेला एरियल शॉट थेट प्रेक्षकांमध्ये गेला. हा चेंडू षटकार गेला. मात्र, सीमारेषेबाहेर हा चेंडू त्या दारू पिणाऱ्या प्रेक्षकाने झेलला.
सामना पाहण्यासाठी आलेला हा तरुण लगेच उभा राहिला. त्याने बिअरचा ग्लासदेखील सांडू दिला नाही आणि एका हातात अप्रतिम झेल पकडला. या कॅचचा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धचा हा पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने अवघ्या दोन विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने ३५५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा डाव ३७३ धावांवर आटोपला. यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३०२ धावा केल्या. यानंतर केन विल्यमसनच्या १२१ आणि डॅरेल मिशेलच्या ८१ धावांच्या खेळीमुळे किवी संघाने हा सामना शेवटच्या दिवशी दोन गडी राखून जिंकला.