Symptoms and Precautions of Mumps: अन्नाचे पचन होण्यासाठी त्यात लाळग्रंथींमधून (पॅराटीड ग्लॅण्ड) लाळ मिसळली जाते. त्यामुळे अन्न चावण्यास, गिळण्यास तसेच पचण्यास मदत होते. या ग्रंथी दोन्ही बाजूच्या कानाच्या खालच्या बाजूस असतात. विषाणू संसर्गामुळे या ग्रंथींना सूज येते. त्यामुळे कानाच्या खालचा जबडा व गाल फुगलेले दिसतात व त्यांना गालगुंड किंवा गालफुगी म्हणतात. याचे लक्षणे आणि उपचार याबाबत पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रेनच्या पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा बाविस्कर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या मुंबईसह अनेक राज्यांमधील लहान मुलांमध्ये याचा संसर्ग झाल्याचे दिसून येते.
गालावर किंवा गालाखाली सूज येणे व काही दिवसांनी दुसऱ्या बाजूला सूज येते तर कधी एकाच गालावर सूज राहते. काही वेळाला विषाणू संसर्ग पसरून इतर ग्रंथींनाही सूज येते व त्यामुळे गळा, छातीमध्येही वेदना होतात. याशिवाय आणखी काही लक्षणे आहेत.
- थंडी भरून ताप येणे
- गालगुंडाच्या भागात असह्य वेदना होणे
- तोंडाचा जबडा उघडताना त्रास होणे. त्यामुळे अन्न चावणे व गिळणे त्रासदायक ठरते.
- डोकेदुखी आणि कानदुखी.
या आजारात शक्यतो काही दिवस पातळ पदार्थ सेवन करणे उत्तम असते. तिखट व गरम तसेच घट्ट पदार्थ दिल्यास या ग्रंथींवर अधिक ताण येतो व बरे होण्यास वेळ लागतो. गुळण्या करणे व भरपूर पाणी प्यावे. गालगुंडाला विशेष उपचार नाहीत. हा आजार आठवड्याभरात बरा होतो. या आजारामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पेन किलर औषधे तसेच सूज कमी करण्यासाठी व ताप कमी होण्यासाठी काही ठराविक औषधे दिली जातात.
या आजारास प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. या लसीला एमएमआर असे म्हणतात व ही लस गालगुंडांसोबत इतर आजारांनाही प्रतिबंध करते. एमएमआर लस मुलांचं गोवर-कांजिण्या (मिझल्स), गालगुंड (मंप्स) आणि रुबेला या आजारांपासून संरक्षण करते. ही लस दिल्यानंतर एक दोन दिवस मुलांना ताप येऊ शकतो किंवा अंगदुखी होऊ शकते. पण हे सामान्य आहे. १ ते ९ नऊ महिन्याच्या बाळाला लसीचा पहिला डोस देतात. तसंच १५ महिन्यांचे झाल्यावर दुसरा व पाच वर्षं वयाच्या दरम्यान तिसरा डोस दिला जातो.
- गालगुंड हा आजार संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या लाळेतून पसरत असल्याने आजारी व्यक्तीशी संपर्क टाळावा.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीला जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवायला सांगा.
- लहान मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे लहान मुले गालगुंड झालेल्या मुलांचे उष्टे पदार्थ खाणार नाहीत याची काळजी पालकांनी मूल बरे झाल्यावर एक महिना तरी घेणे गरजेचे आहे.
- जर याचा संसर्ग मेंदू, पॅनक्रियाज, कान, मुलांच्या बाबतीत वृषण किंवा मुलींच्या बाबतीत अंडाशयापर्यंत पोचला तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होते.
- कानात संसर्ग झाला तर बहिरेपणाचा धोका असतो.
- तसेच जननेंद्रियांना संसर्ग झाला तर नपुंसकत्व येऊ शकतं. मुलींच्या अंडाशयाला संसर्ग झाला तर भविष्यात वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या