मराठी बातम्या  /  निवडणुका  /  भारतातील आगामी निवडणुका

भारतातील आगामी निवडणुका

यंदाचं म्हणजेच २०२३ हे वर्ष निवडणुकांचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांत निवडणुका होत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या निवडणुका होत असल्यानं लोकसभेची सेमीफायनल म्हणून या निवडणुकांकडं पाहिलं जात आहे. या निवडणुकांचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. ते ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, मोदी सरकारनं ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा मुद्दा हाती घेतला आहे. मात्र, सध्या तरी ही संकल्पना चर्चेच्या पातळीवर आहे. त्यामुळं सर्वच पक्ष आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं रणनीती आखू लागले आहेत.

मिझोराम राज्यातही जानेवारी २०२४ मध्ये निवडणूक होणार आहे. मात्र हे राज्य तुलनेनं खूपच लहान असल्यानं सत्ताधारी भाजपची खरी कसोटी अन्य चार राज्यांत लागणार आहेत. पैकी केवळ मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. तर अन्य दोन राज्यांत काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती सत्तेवर आहे. आगामी निवडणुकीनंतर या राज्यातील चित्र काय असेल, तिथं सत्ता बदल होईल की जनताजनार्दन पुन्हा त्याच पक्षांना संधी देईल, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची यादी

No.राज्याचे नावनिवडणूक वर्षचालू कार्यकाळविधानसभा मतदारसंघलोकसभा मतदारसंघराज्यसभा
1
मिझोराममिझोराम
२०२३१८ डिसेंबर २०१८ ते १७ डिसे. २०२३४०
2
छत्तीसगडछत्तीसगड
२०२४४ जाने २०१९ ते ३ जाने २०२४९०११
3
मध्य प्रदेशमध्य प्रदेश
२०२४७ जाने २०१९ ते ६ जाने २०२४२३०२९११
4
राजस्थानराजस्थान
२०२४१५ जाने २०१९ ते १४ जाने २०२४२००२५१०
5
तेलंगणतेलंगण
२०२४१७ जाने २०१९ ते १६ जाने २०२४११९१७
6
आंध्र प्रदेशआंध्र प्रदेश
२०२४१२ जून २०१९ ते ११ जून २०२४१७५२५११
7
अरुणाचल प्रदेशअरुणाचल प्रदेश
२०२४३ जून २०१९ ते २ जून २०२४६०
8
ओडिशाओडिशा
२०२४२५ जून २०१९ ते २४ जून २०२४१४७२११०
9
सिक्कीमसिक्कीम
२०२४३ जून २०१९ ते २ जून २०२४३२
10
हरयाणाहरयाणा
२०२४४ नोव्हें २०१९ ते ४ नोव्हे २०२४९०१०
11
महाराष्ट्रमहाराष्ट्र
२०२४२७ नोव्हें २०१९ ते २६ नोव्हे २०२४२८८४८१९
12
झारखंडझारखंड
२०२५६ जाने २०२० ते ५ जाने २०२५८११४
13
दिल्लीदिल्ली
२०२५२४ फेब्रु २०२० ते २३ फेब्रु २०२५७०
14
बिहारबिहार
२०२५२३ नोव्हे २०२१ ते २२ नोव्हे २०२५२४३४०१६
15
आसामआसाम
२०२६२१ मे २०२१ ते २० मे २०२६१२६१४
16
केरळकेरळ
२०२६२४ मे २०२१ ते २३ मे २०२६१४०२०
17
तामिळनाडूतामिळनाडू
२०२६११ मे २०२१ ते १० मे २०२६२३४३९१८
18
पश्चिम बंगालपश्चिम बंगाल
२०२६८ मे २०२१ ते ७ मे २०२६२९४४२१६
19
पुड्डुचेरीपुड्डुचेरी
२०२६१६ जून २०२१ ते १५ जून २०२६३०
20
गोवागोवा
२०२७१५ मार्च २०२२ ते १४ मार्च २०२७४०
21
मणिपूरमणिपूर
२०२७१४ मार्च २०२२ ते १३ मार्च २०२७६०
22
पंजाबपंजाब
२०२७१७ मार्च २०२२ ते १६ मार्च २०२७११७१३
23
उत्तराखंडउत्तराखंड
२०२७२९ मार्च २०२२ ते २८ मार्च २०२७७०
24
उत्तर प्रदेशउत्तर प्रदेश
२०२७२३ मार्च २०२२ ते २२ मार्च २०२७४०३८०३१
25
गुजरातगुजरात
२०२७१२ डिसें २०२२ ते ११ डिसें २०२७१८२२६११
26
हिमाचल प्रदेशहिमाचल प्रदेश
२०२७१२ डिसें २०२२ ते ११ डिसें २०२७६८
27
मेघालयमेघालय
२०२८२३ मार्च २०२३ ते २२ मार्च २०२८६०
28
नागालँडनागालँड
२०२८२३ मार्च २०२३ ते २२ मार्च २०२८६०
29
त्रिपुरात्रिपुरा
२०२८२३ मार्च २०२३ ते २२ मार्च २०२८६०
30
कर्नाटककर्नाटक
२०२८१७ मे २०२३ ते १६ मे २०२८२२४२८१२

२०२३ भारतातील आगामी निवडणुका

२०२३ च्या अखेरीस आणि २०२४ च्या सुरुवातीला होणारी निवडणूक यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा बरीच वेगळी असणार आहे. ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे, त्यापैकी बहुतेक राज्यांत यापूर्वी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होता. यावेळचं चित्र वेगळं आहे. देशपातळीवर केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात इंडिया नावाची आघाडी आकाराला आली आहे. येत्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचं बळ त्या-त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाला लाभणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण व मिझोराम या पाचही राज्यात काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. पैकी राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट हा प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव हे सत्ता राखून आहेत. राजस्थानमध्ये भाजपला अशोक गेहलोत यांच्यासारख्या कसबी राजकारण्याशी सामना करावा लागेल. तर, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या लोकप्रियतेशी भाजपची टक्कर असेल. तेलंगणमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना फारसा वाव नाही. काँग्रेसला इंडिया आघाडीची थोडीफार साथ मिळेल, पण पक्षाला सत्तेपर्यंत नेण्यासाठी ती पुरशी ठरेल का याबाबत साशंकता आहे. मध्य प्रदेशात भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. मिझोरामचं राजकारण प्रादेशिक अस्मितेभोवतीच फिरेल असं चित्र आहे.

राजस्थान

राजस्थान विधानसभेची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या आसपास होऊ घातली आहे. राजस्थान विधानसभेचे २०० सदस्य या निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. यापूर्वी २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपच्या वसुंधरा राजे यांची राजवट उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतली होती. काँग्रेस बहुमतापेक्षा अवघी एक जागा कमी मिळाली होती. मात्र, अशोक गेहलोत यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या व अनुभवाच्या बळावर पाच वर्षे सत्ताशकट हाकला. भाजपला अवघ्या ७३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये राजस्थानच्या राजगादीसाठी थेट लढत होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तीव्र मतभेदाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी नोव्हेंबर महिन्यात किंवा त्याआधी निवडणूक होणार आहे. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं ६८ जागा जिंकत राज्याची सत्तासूत्रे ताब्यात घेतली होती. तीनदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री रमण सिंह यांना धोबीपछाड देत काँग्रेसनं हा विजय मिळवला होता. निकालाआधीचे सगळे एक्झिट पोल काँग्रेसच्या विजयानं अर्थहीन ठरवले होते. नोव्हेंबर २००० छत्तीसगड राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून एकदाही काँग्रेसला इथं विजय मिळवता आला नव्हता. २००३ पासून सलग १५ वर्षे रमण सिंह हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. अपयशाची ही परंपरा २०१८ साली मोडीत निघाली. आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसचे भूपेश बघेल हे सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची सत्ता उलथवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी येत्या नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली होती. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आला होता. समाजवादी पक्षाचा एक आमदार, बसपचे दोन आमदार आणि चार अपक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर काँग्रेसनं बहुमताचा ११४ आकडा गाठत सत्ता स्थापन केली होती. कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. मात्र, २०२० साली युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या २२ समर्थक आमदारांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं काँग्रेस सरकार पडलं आणि शिवराजसिंह चौहान यांनी २३ मार्च २०२० साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आगामी निवडणुकीत पूर्ण बहुमतानं सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे.

तेलंगण

तेलंगण विधानसभेची निवडणूक डिसेंबर २०२३ मध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य विधानसभेच्या ११९ जागांसाठी ही निवडणूक होईल. तेलंगण राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार अशी ओळख असलेले के चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. गेल्या काही काळापासून त्यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचे तेलंगण राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. ते अन्य राज्यात विस्तारासाठी प्रयत्नशील असले तरी तेलंगण हे राज्य हातातून जाणे त्यांना परवडणारे नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं ८८ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं होतं. तेलंगण राज्याच्या निर्मितीपासून केसीआर यांनी राज्याच्या राज्यकारणावर एकहाती पकड कायम राखली आहे. २०२३ मध्ये त्यांना हेच चित्र कायम ठेवायचं असून भाजपच्या विस्ताराला चाप लावायचा आहे. २०२४ च्या निवडणुकीत एनडीएचा प्रमुख विरोधक म्हणून देशाच्या राजकारणात भूमिका बजावण्याचा निर्धार केसीआर यांनी केला आहे.

आगामी निवडणुकांसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का?

आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाण होण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीकडं ही लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. मध्य प्रदेश या मोठ्या राज्यातील सत्ता टिकवण्यात भाजप यशस्वी होतो का, यावर बरंच काही अवलंबून आहे.

राजस्थानमध्ये सध्या कोणत्या पक्षाची सत्ता आहे?

राजस्थानमध्ये सध्या अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे.

राजस्थानमधील सत्ता टिकवण्यात काँग्रेस यशस्वी होईल का?

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासारखा कसलेला राजकारणी काँग्रेसचं नेतृत्व करतो आहे. मात्र, तरुण नेते सचिन पायलट यांच्याशी असलेल्या वादामुळं राज्य काँग्रेसमध्ये सध्या दोन गट आहेत. हे गट एकदिलानं काम करतात का त्यावर निकाल अवलंबून असेल. काँग्रेसमध्ये दुफळी असली तरी भाजपमध्येही सारं काही आलबेल नाही. काँग्रेसला टक्कर देऊ शकेल असा नेता भाजपकडं नाही. भाजपची भिस्त वसुंधरा राजे यांच्यावरच आहे.

छत्तीसगडमध्ये सध्या कोणाची सत्ता आहे?

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. भूपेश बघेल हे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.

छत्तीसगडमध्ये सत्तांतराची शक्यता किती आहे?

राज्य स्थापनेनंतर छत्तीसगडमध्ये सलग १५ वर्षे भाजपची सत्ता होती. काँग्रेसची सत्ता केवळ मागील पाच वर्षे आहे. भूपेश बघेल यांच्याबद्दल सध्या तरी तिथं मोठी नाराजी नसल्याचं चित्र आहे. भाजप तिथं कोणता चेहरा देतो आणि काय रणनीती आखतो यावर निकालाची गणिते ठरतील.

मध्य प्रदेशात भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल?

मध्य प्रदेशात भाजपचा मोठा प्रभाव आहे. हिंदुत्वाचं राजकारण इथं मोठ्या प्रमाणात चालतं. मात्र, काँग्रेसला देखील या राज्यात मोठा जनाधार आहे. कमलनाथ यांची मधील काही वर्षे वगळता गेली अनेक वर्षे मध्य प्रदेशात भाजपचे शिवराज सिंह चौहान यांचं सरकार आहे. त्यामुळं भाजपला सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो. मागील वेळी देखील काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळं भाजपला ही निवडणूक कठीण जाणार असल्याचं बोललं जात आहे.

मध्य प्रदेशात भाजपसमोर पक्षांतर्गत आव्हान आहे का?

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात अंतर्गत नाराजी असल्याचं समजतं. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती नाराज आहेत. नुकताच तिथं आरएसएसच्या माजी प्रचारकांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. या सगळ्याचा फटका भाजपला बसू शकतो.

चंद्रशेखर राव तेलंगणात पुन्हा सत्ता घेणार का?

तेलंगण राज्याची निर्मिती झाल्यापासून के. चंद्रशेखर राव इथल्या राजकारणावर पकड ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देईल असा नेता तेलंगणमध्ये दिसत नाही. त्यामुळं ते सत्ता राखतील असंच चित्र आहे.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये किती फायदा होईल?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो यात्रा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण या चारही राज्यांतून गेली होती. या यात्रेमुळं काँग्रेसबद्दल एक सकारात्मक जनमत तयार झालं आहे. त्याचा काही प्रमाणात फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असं जाणकारांचं मत आहे.