मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MS Swaminathan : आयपीएसची नोकरी सोडून शेतीच्या अभ्यासात रमले; स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक कसे बनले?

MS Swaminathan : आयपीएसची नोकरी सोडून शेतीच्या अभ्यासात रमले; स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक कसे बनले?

Sep 28, 2023, 05:48 PM IST

  • Who was MS Swaminathan : कृषी शास्त्रज्ञ एम एम स्वामीनाथन देशातील हरित क्रांतीचे जनक कसे ठरले? वाचा त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास 

MS Swaminathan

Who was MS Swaminathan : कृषी शास्त्रज्ञ एम एम स्वामीनाथन देशातील हरित क्रांतीचे जनक कसे ठरले? वाचा त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

  • Who was MS Swaminathan : कृषी शास्त्रज्ञ एम एम स्वामीनाथन देशातील हरित क्रांतीचे जनक कसे ठरले? वाचा त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास 

Who was MS Swaminathan : सुप्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचं आज वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं देशानं एक महान सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ही पदवी त्यांना कशी मिळाली? त्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेणं औचित्याचं ठरावं.

ट्रेंडिंग न्यूज

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारतानं विविध क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकायला सुरुवात केली होती. मात्र, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी व पावसाचा लहरीपणा यामुळं त्याकाळी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असायचा. खाणारी तोंड वाढत जात असल्यानं अन्नधान्याची गरज भागवणं हे देशापुढचं महत्त्वाचं आव्हान होतं. दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अन्नधान्याच्या गरजेच्या पूर्तीवर भर दिला होता. याचीच परिणती पुढं हरित क्रांतीमध्ये झाली. एमएस स्वामीनाथन हे या क्रांतीचे जनक होते.

उच्च उत्पादन देणारी वैविध्यपूर्ण (HYV) बियाणे, यांत्रिक शेती उपकरणे, सिंचन प्रणाली, सुधारित खते यासारख्या नव्या कल्पनांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतीचं स्वरूप आरपार बदलून टाकलं. १९६० च्या दशकात दुष्काळात स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांसोबत महत्त्वाचं काम केलं. म्हणूनच ते हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात.

IPS नोकरी सोडून शेतीच्या क्षेत्रात उतरले!

स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ चा. कुंभकोणम इथल्या कॅथोलिक लिटल फ्लॉवर हायस्कूलमध्ये जाण्याआधी त्यांनी स्थानिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. प्राणीशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची आयपीएस पदासाठी निवड झाली, परंतु त्यांनी कृषी क्षेत्राची निवड केली. १९४३ चा बंगालचा दुष्काळ आणि संपूर्ण उपखंडात दुसऱ्या महायुद्धात तांदळाचा निर्माण झालेला तुटवडा ही परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली होती. हे पाहून त्यांनी जीवन कृषी क्षेत्राला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

स्वामीनाथन यांनी त्यानंतर कृषी विज्ञान आणि आनुवंशिकीमध्ये पुढील अभ्यास सुरू ठेवला. १९४७ मध्ये ते दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) जनुकशास्त्र आणि वनस्पती प्रजननाचा अभ्यास करण्यासाठी गेले. १९४९ मध्ये त्यांनी सायटोजेनेटिक्समध्ये ऑनर्ससह पदव्युत्तर पदवी मिळवली. बटाट्याच्या अभ्यासावर त्यांचा विशेष भर होता.

कटकमधील कृष्णस्वामी रामय्या यांच्या इंडिका-जॅपनिका तांदूळ संकरीकरण कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमातील अनुभवानं त्यांच्या पुढील आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकला. ऑक्टोबर १९५४ मध्ये त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) सहाय्यक सायटोटोनिस्ट म्हणून काम केलं. १९५० आणि १९६० च्या दशकात हेक्सापिल तेलाच्या सायटोजेनेटिक्सवर अभ्यास केला. स्वामीनाथन आणि बोरलॉग यांनी हरितक्रांतीच्या काळात तांदूळ आणि तृणधान्याच्या अनेक संकल्पना विकसित केल्या. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेत C4 कार्बन फिक्सेशनसह भाताची लागवड करण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्वामीनाथन यांनी जगातील पहिला उच्च-उत्पादक बासमती तांदूळ विकसित करण्यातही योगदान दिलं.

हरित क्रांतीत मोलाची भूमिका

अनेक प्रकारचे शोध आणि नवीन बियाण्याच्या वाणांच्या विकासानंतर पाश्चिमात्य देशात सुरू झालेल्या हरित क्रांतीचं नेतृत्व भारतात स्वामीनाथन यांनी केलं. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग भारतातील कृषी शास्त्रज्ञ म्हणून केला. त्यांनी भारतीय शेतकर्‍यांना गव्हाच्या उच्च-उत्पादक जाती, खते आणि आधुनिक शेती पद्धतींद्वारे त्यांचं उत्पादन कसं वाढवायचं हे शिकवण्यास सुरुवात केली. त्यातून शेतकऱ्यांचा भार खूपच हलका झाला.

१९६० च्या दशकात त्यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर संस्थांसोबत मिळून HYV जातीचं बियाणं तयार करण्यासाठी काम केलं. देशभरातील शेतकर्‍यांना ते वापरण्यासाठी प्रेरित केलं. एकाच जमिनीवर अधिक उत्पादन कस मिळवायचं याचे धडेही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. स्वामीनाथन यांचे हे प्रयत्न गेमचेंजर ठरले. त्यामुळं पहिल्याच वर्षी देशातील पीक उत्पादन तिपटीनं वाढलं. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांमुळं केवळ चार पिकांच्या हंगामात सरासरी कृषी उत्पादन १२ दशलक्ष टनांवरून २३ दशलक्ष टनांवर गेलं.

स्वामिनाथन यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत कृषी कार्यक्रम आणि धोरणे राबविण्यासाठी काम केलं. त्यामुळं देशाला अनेक वर्षे कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण राहण्यास मदत झाली. १९७९ ते १९८० पर्यंत त्यांनी कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून काम केलं. १९७२ ते १९७९ पर्यंत ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक होते. १९८० ते १९८२ दरम्यान नियोजन आयोगात ते कृषी आणि ग्रामीण विकासाचे प्रभारी होते.

विभाग

पुढील बातम्या