Ashwin Dani death : जगातील आघाडीच्या पेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या एशियन पेंट्स कंपनीचे सह-संस्थापक तथा नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अश्विन दाणी यांचं आज, २८ सप्टेंबर रोजी निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. दाणी यांच्या निधनाबद्दल उद्योग जगतात दु:ख व्यक्त होत आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी कंपनीच्या संचालक मंडळानं दीपक सातवळेकर यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्याचवेळी अश्विन दाणी यांच्याबद्दलही भूमिका स्पष्ट केली होती. दाणी हे कंपनीच्या संचालक मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह/प्रमोटर डायरेक्टर म्हणून कायम राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाचा कंपनीला लाभ होईल असा यामागे उद्देश होता.
दाणी यांचे वडील व त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांनी मिळून १९४२ साली एशियन पेंट्सची मुहूर्तमेढ रोवली होती. दाणी हे १९६८ मध्ये एशियन पेंट्समध्ये कार्यरत झाले. डिसेंबर १९९८ ते मार्च २००९ या कालावधीत दानी यांनी कंपनीचं उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद भूषवलं.
मुंबईत जन्मलेल्या दाणी यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अक्रोन, ओहयो विद्यापीठातून पॉलिमर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. तसंच, न्यूयॉर्कच्या रेन्ससेलर पॉलिटेक्निकमधून रंग विज्ञानात पदविका संपादन केली. एशियन पेंट्समध्ये सक्रिय होण्याआधी त्यांनी अमेरिकेत इनमॉन्ट कॉर्पमध्ये डेव्हलपमेंट केमिस्ट म्हणून काम केलं होतं.
अश्विन दाणी यांच्या नेतृत्वाखाली एशियन पेंट्सनं जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा विस्तार केला. ही कंपनी जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली. संगणकीकृत कलर मिक्सिंग प्रोग्राम सादर करणारे ते पहिले उद्योजक होते. त्यांच्या पश्चात अश्विनला तीन मुलं आहेत. त्यांचा मुलगा मालव दाणी एशियन पेंट्सच्या संचालक मंडळावर आहे.
अश्विन दाणी हे एक योग अभ्यासक होते. त्यांना कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, दाणी कुटुंबाची एकूण संपत्ती ६८ हजार कोटी रुपये आहे.
यंदाच्या वर्ष २०२३ च्या जून अखेरच्या तिमाहीत, एशियन पेंट्सनं १५५० कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. मागील वर्षीच्या तुलनेत हा नफा ५० टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीची एकत्रित विक्री ७ टक्क्यांनी वाढून ९१५३.८ कोटी रुपये झाली आहे. दाणी यांच्या निधनाचं वृत्त येताच कंपनीचे शेअर ३.६९ टक्क्यांनी गडगडला आहे.