मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena: शिवसेना का सोडली ते आधी ठरवा, गोंधळ घालू नका; राऊतांचा बंडोबांना टोला

Shivsena: शिवसेना का सोडली ते आधी ठरवा, गोंधळ घालू नका; राऊतांचा बंडोबांना टोला

Jul 07, 2022, 01:01 PM IST

    • Sanjay Raut Slams Rebels: शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.
Sanjay Raut

Sanjay Raut Slams Rebels: शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

    • Sanjay Raut Slams Rebels: शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

Sanjay Raut attacks Rebels: शिवसेना सोडण्यासाठी वेगवेगळी कारणं देणाऱ्या बंडखोर आमदारांवर खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘बंडखोर आमदार गोंधळून गेले आहेत. नेमकं काय बोलायचं हे त्यांना कळेनासं झालं आहे. पक्ष का सोडला याचं नेमकं कारण त्यांना देता येत नाही. त्यामुळं ते रोज वेगळी नावं घेत सुटलेत. त्यांच्या नेत्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी,’ असा टोला राऊत यांनी हाणला.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'बंडखोर आमदार मुंबईतून पळाले तेव्हा म्हणत होते की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडलो. दुसऱ्या वेळी निधी वाटपाचं कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसला दोष देणं सुरू केलं. तिसऱ्या वेळी सांगितलं की पक्षातले काही लोक मतदारसंघात हस्तक्षेप करत होते म्हणून बाहेर पडलो आणि आता ते माझ्याविरोधात बोलत आहेत. त्यांनी असं गोंधळून जाऊ नये. नेमकं त्यांनी हे सगळं का केलं त्याचं कारण ठरवण्यासाठी स्वत:ची कार्यशाळा घ्यावी. आपण नक्की शिवसेनेतून का बाहेर पडलो हे त्यांनी एकमतानं ठरवावं, असं राऊत म्हणाले.

‘हे सगळे हिंदुत्वासाठी गेले असतील तर २०१४ साली भाजपच्या शिवाय शिवसेनेनं निवडणूक लढवली होती. चांगली कामगिरीही केली होती. त्यावेळी भाजपनं शिवसेनेच्या सोबतची युती तोडली होती. तेव्हा यातलं कुणीच काही बोललं नाही. २०१९ साली भाजपनं शब्द फिरवला तेव्हा यांचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? आता आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची नावं घेऊन काय होणार आहे? तुम्ही का गोंधळला आहात हे आम्हाला माहीत आहे, असं सूचक वक्तव्यही राऊत यांनी केलं.

मी कधीच उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला नसतो!

काही लोकांचं कोंडाळं आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू देत नाही, असा आरोप काही बंडखोर आमदारांनी केला होता. त्यांचा रोख संजय राऊत यांच्यावरही होता. राऊत यांनी हे आरोप स्पष्ट शब्दांत खोडून काढले. 'मी कधीही सरकारी कामात पडत नाही. पक्ष संघटनेचं आणि 'सामना'चं काम मी करतो. पक्षाची भूमिका मांडतो. संघटनेच्या कामापुरता मुख्यमंत्र्यांना भेटतो. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला कधीच नसतो. मंत्रालाय, विधान भवन अशा ठिकाणी मी कधीच नसतो. त्यामुळं असल्या भन्नाट आरोपांना काही अर्थ नाही, असं राऊत म्हणाले.

संदिपान भुमरेंनी माझ्यापुढं लोटांगण घातलं होतं!

माझ्यावर आरोप करणारे संजय राठोड आदल्या दिवशीपर्यंत माझ्याबरोबर होते. सांदिपान भुमरे मंत्री झाले तेव्हा सामनात येऊन त्यांनी प्रेमानं माझ्यापुढं लोटांगण घातलं होतं. तुम्ही होता म्हणून सरकार आलं आणि मंत्री झालो असं ते म्हणाले होते. त्याचं व्हिडिओ फूटेजही मिळेल. संजय राठोड यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं ह्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आमचं मन स्वच्छ आहे, असं राऊत म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या