मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SL Asia Cup 2023 Final : भारताने आशिया कप जिंकला, विक्रमी आठव्यांदा पटकावलं जेतेपद
IND Vs SL Asia Cup 2023 Final live score (AP)

IND vs SL Asia Cup 2023 Final : भारताने आशिया कप जिंकला, विक्रमी आठव्यांदा पटकावलं जेतेपद

Sep 17, 2023, 10:27 AMIST

IND Vs SL Asia Cup 2023 Final live score : आशिया कप 2023 चा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्या कोलंबोत होत आहे. दोन्ही संघ आठव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये आमनेसामने आहेत.

Sep 17, 2023, 06:09 PMIST

भारताने आशिया कप जिंकला

भारताने चमकदार कामगिरी करत आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. भारत आठव्यांदा आशिया कपचा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी ५१ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी अवघ्या ६.१ षटकात पूर्ण केले.

Sep 17, 2023, 05:45 PMIST

भारताची फलंदाजी सुरू

भारतीय डावाची सुरुवात झाली आहे. ईशान किशन आणि शुभमन गिल सलामीला आले आहेत. प्रमोद मदुशनने श्रीलंकेसाठी पहिले षटक टाकले.

Sep 17, 2023, 05:14 PMIST

श्रीलंका ५० धावात गारद

श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर बाद झाला. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीलंकेला केवळ १५.२ षटकेच खेळता आली. मथिशा पाथिराना हा बाद होणारा शेवटचा फलंदाज होता. पाथीरानाला हार्दिक पांड्याने इशान किशनच्या हाती झेलबाद केले. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. यादरम्यान त्याने एक ओव्हर मेडनही टाकली. याशिवाय हार्दिक पांड्याने ३ तर जसप्रीत बुमराहने एका खेळाडूला बाद केले.

Sep 17, 2023, 05:00 PMIST

श्रीलंका ८ बाद ४० धावा

श्रीलंकेच्या संघाच्या विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता हार्दिक पांड्यालाही एक विकेट मिळाली आहे. हार्दिकने दुनिथ वेलालगेला बाद केले. वेललागेने ८ धावा केल्या. १२.३ षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात ४० धावा आहे.

Sep 17, 2023, 04:23 PMIST

श्रीलंकेला १२ धावांवर सहावा धक्का

श्रीलंकेला सहाव्या षटकात १२ धावांवर सहावा धक्का बसला. सिराजने प्रेमदासावर धुमाकूळ घातला आहे. त्याने त्याच्या तिसऱ्या षटकात कर्णधार दासुन शनाकाला क्लीन बोल्ड करून तंबूत पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. सहा षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या ६ विकेटवर १३ धावा आहे. सध्या दुनिथ वेलालगे आणि कुसल मेंडिस क्रीजवर आहेत.

Sep 17, 2023, 04:18 PMIST

मोहम्मद सिराजने ५ विकेट

मोहम्मद सिराजने ५ विकेट घेतल्या आहेत. त्याने कर्णधार शनाकाला ० धावांवर क्लीन बोल्ड केले.

Sep 17, 2023, 04:12 PMIST

सिराजने एका षटकात चार बळी घेतले

सिराजने एका षटकात चार बळी घेतले आहेत. सिराजने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडे झेलबाद केले. निसांकाला ४ चेंडूत २ धावा करता आल्या. एका चेंडूनंतर सादिरा समरविक्रम शुन्यावर तंबूत परतला. यानंतर पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंका इशान किशनकरवी झेल देऊन बाद झाला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर नवीन फलंदाज धनंजय डी सिल्वाने चौकार मारला. त्यामुळे सिराजची हॅट्ट्रिक हुकली. पण शेवटच्या चेंडूवर सिराजने डी सिल्वाला केएल राहुलकरवी झेलबाद केले.

Sep 17, 2023, 03:46 PMIST

बुमराहने केली परेराची शिकार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराह पहिले षटक टाकत आहे. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने श्रीलंकेला धक्का दिला. बुमराहने कुसल परेराला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही.

Sep 17, 2023, 03:29 PMIST

पाऊस थांबला

पाऊस थांबला आहे. पंच मैदानाची पाहणी करत आहेत. कव्हर काढले आहेत. खेळ दुपारी ३.४० वाजता सुरू होऊ शकतो. 

Sep 17, 2023, 03:15 PMIST

मैदानावर कव्हर्स

Sep 17, 2023, 03:12 PMIST

कोलंबोमध्ये पावसाला सुरुवात

कोलंबोमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आज कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा होती. तीन वाजता पावसाची शक्यता होती आणि तेच झाले. अशा स्थितीत खेळ सुरू होण्यास विलंब होत आहे. तीन वाजता खेळ सुरू होणार होता. संपूर्ण मैदान कव्हरने झाकले गेले आहे.

Sep 17, 2023, 02:38 PMIST

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.

Sep 17, 2023, 02:37 PMIST

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल

शनाकाने श्रीलंकेच्या प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. जखमी महेश तिक्ष्णाच्या जागी हेमंता खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये ५ बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर जखमी अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. सुंदर ऑफ स्पिनर आहे.

Sep 17, 2023, 02:34 PMIST

श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 17, 2023, 01:31 PMIST

मोठ्या स्पर्धा जिंकण्यात भारत अपयशी

भारताने २०१९ एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. तर २०१९ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि २०२३ WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले. गेल्या वर्षीच्या आशिया चषकातही भारत काही खास करू शकला नाही. तर श्रीलंकेने टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

Sep 17, 2023, 12:54 PMIST

२०१८ ला भारताने आशिया कप जिंकला

भारताने २०१८ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील शेवटचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळेस भारताने दुबई येथे आशिया कपच्या फायनलमध्ये बांगलादेशचा तीन विकेट्स राखून पराभव केला होता. या विजयानंतर भारताला महत्त्वाचे सामने सामने जिंकण्यात अपयश आले.

Sep 17, 2023, 12:39 PMIST

भारत सात वेळा चॅम्पियन

भारताने वनडे आशिया कप ६ वेळा आणि एकदा टी 20 आशिया कप जिंकला आहे, तर श्रीलंकेने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ वेळा आणि टी-20 मध्ये एकदा विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा यूएईमध्ये टी-२० मध्ये खेळली गेली होती ज्यात श्रीलंकेने बाजी मारली होती. भारतीय संघाने गेल्या पाच वर्षांत एकही विजेतेपद जिंकलेले नाही.

Sep 17, 2023, 11:44 AMIST

आशिया कपमध्ये भारत-श्रीलंका हेड टू हेड

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका २० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १० सामने भारताने तर १० सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. यंदाच्या आशिया चषकात दोन्ही संघ सुपर फोरमध्ये आमनेसामने आले होते. त्यात भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला.

Sep 17, 2023, 11:28 AMIST

श्रीलंकेविरुद्ध भारताचे आकडे मजबूत

भारतीय संघाने श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध ६५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ३१ सामने जिंकले असून श्रीलंकेने २८ सामने जिंकले आहेत. सहा सामन्यांत निकाल लागला नाही. मात्र, श्रीलंकेत या दोघांमधील शेवटच्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी ४ सामने भारताने जिंकले आहेत. एकात दासून शनाका संघ विजयी झाला.

Sep 17, 2023, 10:43 AMIST

भारत-श्रीलंका आठवी फायनल

आशिया चषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील ही आठवी फायनल असेल. भारताला चार वेळा फायनल जिंकण्यात यश आले आहे. त्याचबरोबर श्रीलंकन संघाने तीन वेळा फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे.

Sep 17, 2023, 10:33 AMIST

भारत-श्रीलंका १३ वर्षांनंतर फायनलमध्ये आमनेसामने

भारत आणि श्रीलंका हे संघ १३ वर्षांनंतर आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये शेवटचा अंतिम सामना २०१० मध्ये झाला होता. त्यावेळी भारताने धोनीच्या नेतृत्वात श्रीलंकेचा पराभव केला होता.

 

Sep 17, 2023, 10:43 AMIST

कोलंबोत असं असेल आजचं हवामान

Accuweather च्या रिपोर्टनुसार, आज रविवारी कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असेल. सकाळी काही भागात पाऊस झाला आहे तर दुपारनंतरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलंबोमध्ये आज पावसाची ९० टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो.

Sep 17, 2023, 10:43 AMIST

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत १६६ वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने ९७ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. ११ सामन्यांचा निकाल लागला नाही.तर एक सामना बरोबरीत राहिला.

    शेअर करा