मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ENG vs NZ Highlights : कॉनवे-रचिन रविंद्रची तुफानी शतकं, वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ९ विकेट्सनी पराभव
ENG vs NZ Live Score

ENG vs NZ Highlights : कॉनवे-रचिन रविंद्रची तुफानी शतकं, वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ९ विकेट्सनी पराभव

Oct 05, 2023, 11:16 AMIST

Eng vs NZ world cup 2023 scorecard : वनडे वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. सोबतच न्यूझीलंडने २०१९ च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला.

Oct 05, 2023, 08:51 PMIST

न्यूझीलंडचा मोठा विजय

वनडे वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. सोबतच न्यूझीलंडने २०१९ च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. इंग्लंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३६.२ षटकात १ विकेट गमावत २८३ धावा करत सामना जिंकला. 

न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २७३ धावांची नाबाद भागीदारी केली. कॉनवेने १२१ चेंडूत नाबाद १५२ धावा केल्या. तर रचिनने ९६ चेंडूत नाबाद १२३ धावा केल्या. कॉनवेने आपल्या खेळीत १९ चौकार आणि ३ षटकार मारले. तर रचिनने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. दोघांच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत होते. इंग्लंडकडून फक्त सॅम करनने एक विकेट घेतली.

Oct 05, 2023, 08:36 PMIST

न्यूझीलंड विजयाच्या जवळ

न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध ३४ षटकात एका विकेटवर २४५ धावा केल्या आहेत. डेव्हॉन कॉनवे १२० आणि रचिन रवींद्र ११७ धावांवर खेळत आहेत. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २३५ धावांची भागीदारी केली आहे. न्यूझीलंडला आता विजयासाठी फक्त ३८ धावा करायच्या आहेत.

Oct 05, 2023, 08:17 PMIST

रचिन रविंद्रचे शतक

रचिन रविंद्रने शतक पूर्ण केले आहे. त्याने ८२ चेंडूत १०० वी धाव घेतली. रचिनने आपल्या खेळीत आतापर्यंत ९ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे. कॉनवे आणि रचिन यांच्यात १८३ चेंडूत २१५ धावांची भागिदारी झाली आहे. न्यूझीलंडच्या ३२ षटकात १ बाद २२६ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडला विजयासाठी आणखी ५८ धावा करायच्य आहेत.  

Oct 05, 2023, 08:14 PMIST

डेव्हॉन कॉनवेचे शतक

डेव्हॉन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. न्यूझीलंडने २७ षटकात एका विकेटवर २०० धावा केल्या आहेत. कॉनवे ८७ चेंडूत १०६ धावा आणि रचिन रवींद्र ७४ चेंडूत ९१ धावा करुन खेळत आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी केली आहे.

Oct 05, 2023, 07:19 PMIST

न्यूझीलंडच्या डावाच्या १०० धावा पूर्ण

न्यूझीलंडच्या डावाच्या १०० धावा पूर्ण झाल्या. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली आहेत. दोन्ही खेळाडूंचे विश्वचषकातील हे पहिलेच अर्धशतक आहे. न्यूझीलंडने १३ षटकात १ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत. रचिन ५५ तर कॉनवे ५१ धावांवर खेळत आहे.

Oct 05, 2023, 06:52 PMIST

न्यूझीलंडची वादळी फलंदाजी

कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली आहे. ९ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एक विकेट गमावून ७१ धावा आहे. रवींद्र ३९ धावा करून खेळत आहे. तर कॉनवे ३३ धावांवर फलंदाजी करत आहे.

Oct 05, 2023, 06:19 PMIST

विल यंग शुन्यावर बाद

दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. इंग्लंडचे दुसरे षटक टाकण्यासाठी सॅम करन आला. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला बाद केले. यंग खातेही उघडू शकला नाही आणि यष्टिरक्षक जोस बटलरकरवी झेलबाद झाला.

Oct 05, 2023, 05:44 PMIST

न्यूझीलंडसमोर मोठं लक्ष्य

सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकात ९ बाद २८२ धावा केल्या.

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरने ४३ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३३, हॅरी ब्रूकने २५ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २० धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद १५, डेव्हिड मलान आणि सॅम करनने १४-१४, मार्क वुडने नाबाद १३, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने ११-११ धावा केल्या.

Oct 05, 2023, 05:38 PMIST

इंग्लंडच्या २८२ धावा

क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकात ९ बाद २८२ धावा केल्या.

Oct 05, 2023, 05:23 PMIST

इंग्लंडने सलग दोन षटकांत दोन विकेट गमावल्या

सलग दोन षटकांत इंग्लंडने दोन विकेट गमावल्या. ४५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मिचेल सँटनरने ख्रिस वोक्सला बाद केले. १२ चेंडूत ११ धावा करून वोक्स विल यंगकरवी झेलबाद झाला. पुढच्याच षटकात सॅम करनही पॅव्हेलियनमध्ये परतला. करन १९ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्याला मॅट हेन्रीने टॉम लॅथमच्या हाती झेलबाद केले. या सामन्यात मॅट हेन्रीची ही तिसरी विकेट आहे.

Oct 05, 2023, 06:50 PMIST

जो रूटही पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रूटही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रुटने संघासाठी ७७ धावांची खेळी केली. त्याने ८६ चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले. रूटच्या बॅटमधून १ षटकारही आला . ४२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने त्याला क्लीन बोल्ड केले.

Oct 05, 2023, 04:53 PMIST

इंग्लंडला सहावा धक्का

ट्रेन्ट बोल्टने इंग्लंडला सहावा धक्का दिला. त्याने लियाम लिव्हिंस्टोनला झेलबाद केले, लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूत २० धावा केल्या. इंग्लंडच्या ३९ षटकात ६ बाद २२३ धावा झाल्या आहेत. जो रुट ७३ तर सॅम करन १ धावेवर खेळत आहे.

Oct 05, 2023, 03:55 PMIST

मोईन अली बाद

ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडला चौथे यश मिळवून दिले. २२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने मोईन अलीला क्लीन बोल्ड केले. मोईनने १७ चेंडूत ११ धावा केल्या. इंग्लंडने २२ षटकात ४ विकेट गमावत १२१ धावा केल्या आहेत. जो रूट ३३ तर कर्णधार जोस बटलर दोन धावांवर खेळत आहे.

Oct 05, 2023, 03:33 PMIST

हॅरी ब्रुक बाद

रचिन रवींद्रने न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले. त्याने हॅरी ब्रूकला झेलबाद केले. डावाच्या १७व्या षटकात ब्रूकने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर सहाव्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात तो डेव्हन कॉनवेच्या हाती झेलबाद झाला.

Oct 05, 2023, 03:01 PMIST

जॉनी बेअरस्टो बाद

 १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर इंग्लंड संघाला दुसरा धक्का  बसला. मिचेल सँटनरने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो ३५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. सॅंटनरच्या चेंडूवर तो डॅरिल मिशेलकरवी झेलबाद झाला. इंग्लंडने १३ षटकांत दोन गडी गमावून ६४ धावा केल्या आहेत. जो रूट १५ तर हॅरी ब्रूक शुन्यावर खेळत आहेत.

Oct 05, 2023, 02:47 PMIST

इंग्लंडला पहिला धक्का

इंग्लंडला पहिला धक्का डेव्हिड मलानच्या रूपाने बसला. आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅट हेन्रीने त्याला बाद केले. २४ चेंडूत १४ धावा करून मलान यष्टिरक्षक टॉम लॅथमकरवी झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. मलान बाद झाल्यानंतर अनुभवी फलंदाज जो रूट क्रीझवर आला आहे. इंग्लंडने आठ षटकांत एक विकेट गमावत ४१ धावा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टो  २४ आणि जो रूट धाव करुन खेळत आहेत.

Oct 05, 2023, 02:11 PMIST

इंग्लंडची वेगवान सुरुवात

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने वेगवान सुरुवात केली आहे. जॉनी बेअरस्टोने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार ठोकला. इंग्लंडने पहिल्या षटकात १२ धावा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टो ११ आणि डेव्हिड मलान एका धावेवर खेळत आहेत.

Oct 05, 2023, 01:43 PMIST

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.

इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

Oct 05, 2023, 01:37 PMIST

न्यूझीलंडची प्रथम गोलंदाजी

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाहीये. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच वेळी, बेन स्टोक्स इंग्लंडच्या प्लेइंग-११ मध्ये नाही.

Oct 05, 2023, 01:15 PMIST

थोड्याच वेळात टॉस

विश्वचषकाचा पहिला सामना काही वेळात सुरू होईल. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार टॉम लॅथम नाणेफेकसाठी मैदानात येतील. 

Oct 05, 2023, 11:59 AMIST

अहमदाबादची पीच कशी आहे

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाल आणि काळ्या मातीच्या दोन वेगवेगळ्या खेळपट्ट्या आहेत. तसेच, या दोन्ही प्रकारच्या मातीच्या मिश्रणातून तयार केलेली खेळपट्टीही येथे आहे. लाल मातीने बनवलेल्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते, तर काळ्या मातीची खेळपट्टी थोडी संथ आहे, जी फिरकीपटूंसाठी चांगली आहे. हा सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाणार हे सध्या स्पष्ट नाही. पण दोन्ही प्रकारच्या मातीपासून बनवलेल्या खेळपट्टीवर हा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.

Oct 05, 2023, 11:48 AMIST

१० मैदानांवर रंगणार सामने

विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे स्पर्धा आहेत. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत.

Oct 05, 2023, 11:38 AMIST

राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार वर्ल्डकप

 एकदिवसीय वर्ल्डकप ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे. १० पैकी अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता.

Oct 05, 2023, 11:16 AMIST

असं असेल अहमदाबादचे हवामान

इंग्लंड-न्यूझीलंड सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. यावेळी आकाश पूर्णपणे निरभ्र होईल. याशिवाय अहमदाबादचे तापमान ३५अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. बुधवारी अहमदाबादमध्ये सूर्यप्रकाश असेल. तसेच ताशी २२ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. या सामन्यावर पावसाचा परिणाम होणार नाही.

Oct 05, 2023, 11:06 AMIST

न्यूझीलंड-इंग्लंड भिडणार

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला (ODI world cup 2023) आजपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. २०१९ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

    शेअर करा