मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 5 June 2023 : मुख्यमंत्र्यांनी घेतलं सुलोचना दीदींचं अंत्यदर्शन
Live News Updates (HT)

Live News Updates 5 June 2023 : मुख्यमंत्र्यांनी घेतलं सुलोचना दीदींचं अंत्यदर्शन

Jun 05, 2023, 04:38 PMIST

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सुलोचना दीदींचं अंत्यदर्शन घेतलं व कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

Jun 05, 2023, 04:38 PMIST

महावितरणच्या वर्धापनदिनानि‍मित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

महावितरणचा १८ वा वर्धापनदिन ६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपासून राज्यभर मंडल स्तरावर महावितरणचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. यंदाही औरंगाबादमध्ये ५ व ६ जून रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ५ जून रोजी महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने बसस्थानक व क्रांती चौक परिसरात अनुक्रमे सकाळी साडेआठ व साडेनऊ वाजता ऊर्जा विषयावरील पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. ६ जून रोजी सकाळी ७ वाजता महावितरणचे मिलकॉर्नर येथील प्रशासकीय कार्यालय ते सूतगिरणी उपकेंद्र या मार्गावर महावितरणच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथासह मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीच्या समारोपानंतर सूतगिरणी उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

Jun 05, 2023, 01:04 PMIST

Ansari : गँगस्टर मुख्तार अन्सारीला अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने ठरवले दोषी

 गँगस्टर मुख्तार अन्सारी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. वाराणसीच्या एमपी-एमएलए कोर्टाने ३२  वर्षापूर्वीच्या  एका खटल्यासंदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी दोषी ठरवले आहे. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी सोमवारी कोर्टानी त्यांना दोषी ठरवले आहे. तर लंच ब्रेकनंतर अन्सारी यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Jun 05, 2023, 12:46 PMIST

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचं पार्थिव मुंबईतील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचनादीदींचं अंत्यदर्शन घेतलं व कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

Jun 05, 2023, 12:39 PMIST

महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

Jun 05, 2023, 12:38 PMIST

Pune : माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी; जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि माळेगावचा होणार सन्मान

 राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ३.० अंतर्गत भूमी, जल, वायु, आकाश आणि अग्नी या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी केली असून जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि माळेगावचा सन्मान करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याने अभियानात चांगली कामगिरी केल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्याने गतवर्षीदेखील अभियानात चांगली कामगिरी केली होती. पंचतत्वावर आधारित सूक्ष्म नियोजन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित अभियानातील यशाची परंपरा कायम ठेवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्याचा सन्मान होणार आहे.

Jun 05, 2023, 11:28 AMIST

Pune news : विनातिकीट दंड वसुलीतून रेल्वेची कोट्यवधींची कमाई

रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई सुरू आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने मे महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २६ हजाराहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.

Jun 05, 2023, 10:51 AMIST

Jejuri : मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती केल्याप्रकरणी याचिकेवर आज सुनावणी 

 जेजुरी बाहेर विश्वस्तांची मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांनी पुनर्विचार याचिका धर्मादायुक्तांकडे दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे

Jun 05, 2023, 09:00 AMIST

prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नगर शहरात

 वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर नगर शहरात येणार असून शेवगाव दंगल प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

Jun 05, 2023, 08:59 AMIST

MP Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे सकाळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची घेणार भेट 

 खासदार श्रीकांत शिंदे सकाळी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लोकल ट्रेन संदर्भात चर्चा करणार आहेत.

Jun 05, 2023, 08:58 AMIST

Mumbai : मुंबईत दिल्ली येथील पैलवानाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कॉँग्रेस करणार आंदोलन 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वा लाखे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या महिला पैलवानांच्या समर्थनार्थ आज दुपारी ४  वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

Jun 05, 2023, 08:16 AMIST

गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्याच्या वेशीवर दाखल होणार

गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्याच्या वेशीवर दाखल होणार आहे. साधारण साडेसातशे वारकरी एका महिन्यामध्ये शेगाव ते पंढरपूरला असा साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करणार आहेत.

Jun 05, 2023, 08:16 AMIST

Nashik : संतश्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराजांची पालखी नाशिक शहरात पोहचली

 

नाशिक - संतश्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराजांची पालखी नाशिक शहरात पोहचली आहे. पालखी आज नाशिकहून सिन्नरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. 

Jun 05, 2023, 07:32 AMIST

Odisha Train Accident : ओडिशातील अपघात मार्गावरील वाहतूक तब्बल ५१ तासांनंतर पूर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना

Balasore Train Accident: ओडिशातील बालासोर येथे तब्बल ५१ तासांनंतर अपघातस्थळावरून पहिली रेल्वे धावली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी त्यांनी हात जोडून प्रार्थना केली. अप मार्गाच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. हा मार्ग उद्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Jun 05, 2023, 06:42 AMIST

mumbai :मुंबई भाजप-काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद

मुंबई भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदा होणार आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

Jun 05, 2023, 06:41 AMIST

Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत?

आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाहांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Jun 05, 2023, 06:29 AMIST

Gyanvapi cases : ज्ञानवापीमधील हिंदू पक्षकारांमध्ये मतभेद; प्रमुख याचिकाकर्त्यांची खटल्यातून माघार

Gyanvapi cases : आपला ‘छळ’ होत असल्यामुळे वाराणसीतील ज्ञानवापी मुद्दय़ाशी संबंधित सर्व खटल्यांतून माघार घेत आहोत, असे प्रमुख हिंदू पक्षकार जितेंद्र सिंह विसेन यांनी जाहीर केले आहे. विसेन हे विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख असून काही जणांनी स्वार्थासाठी या प्रकरणात उडी घेऊन हिंदूंचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला.

    शेअर करा