मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 17 April 2023 : राज ठाकरेंची अचानक पुणे कार्यालयास भेट; पदाधिकाऱ्यांची पळापळ, तासभर चर्चा
Live News

Live News Updates 17 April 2023 : राज ठाकरेंची अचानक पुणे कार्यालयास भेट; पदाधिकाऱ्यांची पळापळ, तासभर चर्चा

Apr 17, 2023, 10:52 PMIST

raj thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी शहर कार्यालयाला अचानक भेट दिली.

Apr 17, 2023, 10:52 PMIST

राज ठाकरे अचानक पुण्यातील पक्ष कार्यालयात, पदाधिकाऱ्यांची धांदल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी शहर कार्यालयाला अचानक भेट दिली. राज यांच्या या भेटीची पूर्वकल्पना नसल्याने शहर पातळीतील वरील पदाधिकाऱ्यांची कार्यालयात पोहोचण्यासाठी धांदल उडाली. तासाभराच्या बैठकीत राज यांनी विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Apr 17, 2023, 06:57 PMIST

भूकंपाच्या धक्क्यानं आसाम हादरलं! गुवाहाटीजवळ ३.७ तीव्रतेचा भूकंप

भूकंपाच्या धक्क्यानं आसाम हादरलं! गुवाहाटीजवळ ३.७ तीव्रतेचा भूकंप

भूकंपाच्या धक्क्याने आसाम हादरलं आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी आसाममधील गुवाहाटीजवळ रिश्टर स्केलवर ३.७ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भुकंपाचे केंद्र गुवाहाटीपासून २१ किमी पश्चिम उत्तरपश्चिमेला व जमिनीच्या आत १० किमी खोल होता. 

 

Apr 17, 2023, 06:54 PMIST

Nawab Malik : नवाब मलिक यांना जामीन नाहीच! कोठडी १४ दिवसांनी वाढली

प्रकृतीचं कारण देऊन जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पुन्हा धक्का बसला आहे. मलिक यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक हे कुर्ला येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात सध्या कोठडीत आहेत.

Apr 17, 2023, 06:53 PMIST

पुणे, सातारा, कोल्हापूर व नांदेड जिल्ह्यात येत्या ३ ते ४ तासात पावसाची शक्यता

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर व नांदेड जिल्ह्यात येत्या ३ ते ४ तासात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जोरदार वाऱ्याबरोबरच विजांच्या कडकडाटही होणार असल्याची शक्यता आहे. 

Apr 17, 2023, 05:57 PMIST

Kharghar Incident : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारींची प्रतिक्रिया, म्हणाले....

Appasaheb Dharmadhikari On Kharghar Incident : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या श्री सेवकांचा परिवार देशभर पसरलेला असून काल घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. राजकीय नेत्यांनी त्याचं राजकारण करायला नको. हे संकट माझ्या कुटुंबावर आलेलं असून एकमेकांसोबत राहण्याची आमची परंपरा आहे, असं म्हणत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी खारघरमधील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

Apr 17, 2023, 05:04 PMIST

ठाण्यात कॉंग्रेसचे ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन

ठाणे: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. गंभीर प्रश्नावर पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही असं सांगत ठाण्यात आज काँग्रेसतर्फे ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन करण्यात आलं.

Apr 17, 2023, 04:58 PMIST

Pulwama : पुलवामा स्फोटावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू; नाना पटोले यांचा इशारा

जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणं योग्य नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षानं ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला आहे. पुलवामा प्रकरणी नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Apr 17, 2023, 04:10 PMIST

Tata nexon :  नवीन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स #DARK लाँच

दोन विश्‍वांच्‍या सर्वोत्तम बाबींना एकत्र आणत टाटा मोटर्सने या भारतातील अग्रगण्‍य ऑटोमोबाइल उत्‍पादक आणि भारतातील ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने #DARK टू द मॅक्‍ससह भारतातील लोकप्रिय ईव्‍ही #DARK अवतारामध्‍ये लाँच केली.

Apr 17, 2023, 04:09 PMIST

Closing bell :  सेन्सेक्स निफ्टीच्या वाढीला ब्रेक, सेन्सेक्समध्ये ५२० अंशांची घट 

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने गेल्या नऊ दिवसांच्या वाढीला ब्रेक बसला. सोमवारी सेन्सेक्स ५२०.२५ अंकांनी घसरून ५९,९१०.७५ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी १२१.१५ अंकांनी घसरून १७,७०६.८५ वर बंद झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 81.98 (तात्पुरता) वर बंद झाला.

Apr 17, 2023, 11:21 AMIST

Sensex Nifty Down : निर्देशांकाची ६९८.८६ अंशांची गटांगळी 

सोमवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास निर्देशांकात तब्बल ०.९३ टक्के म्हणजेच ६९८.८६ अंशांची घसरण पहायला मिळत आहे. सेन्सेक्स ५९,७३२.१४ अंश पातळीवर ट्रेड करत आहे. तर निफ्टीतही अंदाजे १७७.१० अंशांची म्हणजे ०.९९ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सकाळच्या सत्रातच शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली आहे. गेल्या १६ दिवस शेअऱ खरेदीचा सपाटा लावणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांनी आज विक्रीला प्राधान्य दिले आहे.   

Apr 17, 2023, 11:04 AMIST

Ajit Pawar : अजित पवार यांचे पुण्यातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. आज अजित पवार यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्यानं चर्चेत ऊत आलं आहे. अजित पवार सध्या मुंबईतच आहेत.

Apr 17, 2023, 10:45 AMIST

Pune : डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार

डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने डॉ. अमरसिंह निकम यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम,  डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले. त्यावेळी  सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील असंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. हा सोहळा आय. एच. झेड. टी. या संस्थेने आयोजित केला होता.

डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार
डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार

Apr 17, 2023, 09:48 AMIST

Uddhav Thackeray : काँग्रेसचे नेते वेणूगोपाल आज 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही पक्ष कधी नव्हे इतके जवळ आले आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. लवकरच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय के. सी. वेणूगोपाल मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री साडेआठ वाजता ही भेट होणार आहे.

Apr 17, 2023, 09:23 AMIST

Opening Bell :  सेन्सेक्स वाढीला ब्रेक, निर्देशांकाची सुरुवात निराशाजनक 

यटी कंपनी इन्फोसिस आणि एचडीएफसीच्या निकालावर प्रतिक्रिया देत सोमवारी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सलग नऊ सत्रांतील वाढीला आज ब्रेक बसला आहे. सेन्सेक्समध्ये सुरुवातीला ५६२.८५ अंशांची घसरण नोंदवत तो  सध्या ९ वाजून २१ मिनिटांनी अंदाजे  ५९,८६२.१५ अंश पातळीवर ट्रेड करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीतही अंदाजे  १४८.९५ अंशांची घट नोंदवत तो १७,६७९.०५ अंश पातळीवर ट्रेड करत आहे. 

Apr 17, 2023, 07:58 AMIST

Pune : गटारात पडलेल्या वासराची अग्निशमन दलाकडून सुटका

मार्केटयार्ड परिसरात उघड्या गटारात पडलेल्या वासराची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक तीनजवळ उघड्या गटारात वासरू पडल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान शरद गोडसे, संभाजी अवताडे, सुरज कारले, तुषार जानकर, हर्षद येवले आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. जवानांनी दोरीचा वापर करून वासराची पंधरा मिनिटांत सुखरूप सुटका केली. मार्केट यार्ड परिसरातील गटारांची झाकणे तुटलेली आहेत. काही गटारांना झाकणे नाहीत. गटरांना झाकणे नसणे, तसेच तुटलेल्या झाकणांमुळे किरकोळ अपघात घडल्याच्या तक्रारी मार्केट यार्ड भागातील नागरिकांनी केल्या आहेत.

गटारात पडलेल्या वासराची अग्निशमन दलाकडून सुटका
गटारात पडलेल्या वासराची अग्निशमन दलाकडून सुटका

Apr 17, 2023, 07:57 AMIST

Pune : ज्येष्ठ साहित्यिक माधव पोतदार यांचे निधन

वैचारिक, चरित्रपर आणि ललित लेखनाच्या क्षेत्रात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव पोतदार (वय ८९) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. मुक्त पत्रकार पराग पोतदार हे त्यांचे पुत्र होत. मराठीचे प्राध्यापक असलेले डॉ. माधव पोतदार गेली अनेक वर्षे संशोधन अभ्यासात व्यग्र होते. विविध विषयांवर त्यांनी १८३ पुस्तकांचे लेखन केले असून नुकतेच त्यांचे ‘कसे जगावे कसे रहावे’ हे १८३ वे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. करोना काळात त्यांनी २० पुस्तकांचे लेखन केले. तसेच वयाच्या ८७ व्या नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवले होते. मूळचे पेण जवळच्या लहान गावातून आलेल्या डॉ. माधव पोतदार यांनी पेणमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानदान केलेच. परंतु, शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या दोन हजार महिलांना पदवीधर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले होते.

Apr 17, 2023, 07:16 AMIST

Sangli : खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज सासनकाठी गुलालाच्या उधळण 

 आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असून सासनकाठी गुलालाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल होतात.

Apr 17, 2023, 07:15 AMIST

Sharad Pawar : विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज बारामती दौरा 

 विरोधी पक्ष नेते अजित पवार सकाळी ९  वाजल्यापासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ९ वाजता वडकी भागातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन. त्यानंतर भिवरी गावातील विकास कामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर सकाळी ११  वाजता सासवड शहरात युवक आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.  शरद पवार हे बारामतीतील कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.

Apr 17, 2023, 07:14 AMIST

Pune : पुण्यात आज कॉँग्रेसचे शर्म करो आंदोलन 

 कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कॉंग्रेसकडून राज्यभर पुकारण्यात आलेल्या शर्म करो आंदोलनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहणार आहेत.

Apr 17, 2023, 07:13 AMIST

Mumbai : सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेणार

पंतप्रधान आवास योजनेतील  ७ हजार  ८४९  घरांची लॉटरी काढताना सिडकोने अल्पउत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे ३५  लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने हे दर कमी करावेत म्हणून सिडकोसोडत धारक लढा देत आहेत. याचाच भाग म्हणून आज सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Apr 17, 2023, 07:12 AMIST

Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू होणार आहे. तसेच या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याकरता संजय राऊत सकाळी ११  वाजेपर्यंत मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Senior Shiv Sena leader Sanjay Raut. (PTI Photo)
Senior Shiv Sena leader Sanjay Raut. (PTI Photo) (HT_PRINT)

Apr 17, 2023, 07:10 AMIST

Rahul Gandhi : राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात आज बीदर जिल्ह्यातील भल्की आणि हुमानाबाद येथे दोन सभा 

राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. बीदर जिल्ह्यातील भल्की आणि हुमानाबाद येथे दोन सभांना संबोधित करणार आहेत.

Rahul gandhi Bail
Rahul gandhi Bail

Apr 17, 2023, 07:07 AMIST

Delhi vidhan sabha adhiveshan : दिल्ली विधानसभेचं आज एक दिवसाचं अधिवेशन

दिल्ली विधानसभेचं आज एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. यावेळी अरविंद केजरीवालांना सीबीआयची नोटीस, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली विधानसभेच्या बाहेर केजरीवाल विरोधात भाजप आंदोलन करणार आहेत.

Apr 17, 2023, 07:02 AMIST

Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पंचायत पुरस्काराचे वितरण 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी चांगलं काम करणाऱ्या पंचायतीला पुरस्कार दिला जाणार आहे.

Apr 17, 2023, 07:00 AMIST

Maharashtra Politics :  राज्यपाल नियुक्त १२ आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी

Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त १२ आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राज्यासाठी हा महत्वाचा निर्णय राहणार आहे.

    शेअर करा