मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 25 July 2022 Live: 'मंंत्रिमंडळ विस्तार न होणं हा राज्याचा अपमान'
Ajit Pawar

Marathi News 25 July 2022 Live: 'मंंत्रिमंडळ विस्तार न होणं हा राज्याचा अपमान'

Jul 25, 2022, 05:37 PMIST

Daily News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Jul 25, 2022, 10:41 PMIST

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे उद्घाटन

पुणे:  जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माजंरी येथील गामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या व्याख्याता डॉ. सोनाली घुले, भूषण जोशी आदी उपस्थित होते. या ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत सुरु असलेल्या कामांचे जिओ मॅपिग करण्यात येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढून वेळेच्या बचतीबरोबर गतिमानता येण्यास मदत होणार आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डॉऊनलोड करुन नोंदणी करावी लागणार आहे.

पुणे जिल्हा परिषद

पुणे जिल्हा परिषद

Jul 25, 2022, 08:32 PMIST

Pune Crime : प्रभात रस्त्यावर ज्येष्ठ महिलेची पिशवी हिसकावली

पुण्यातील प्रभात रस्ता परिसरात एका ज्येष्ठ महिलेची पिशवी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला कोथरुड परिसरात राहायला आहेत. त्या प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ परिसरातून जात होत्या. सोजस हाऊस इमारतीसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

Crime News

Crime News (HT_PRINT)

Jul 25, 2022, 05:37 PMIST

The Madras Murder: SonyLIV ने केली पत्रकाराच्या हत्येवर आधारित वेब सिरीजची घोषणा

सोनी लिव्हने नुकतीच 'द मद्रास मर्डर' या वेबसीरिजची घोषणा केली आहे. ही वेबसीरिज १९४० झालेल्या एका पत्रकाराच्या हत्येवर आधारित आहे. हा पत्रकार येलो पत्रकारितेसाठी लोकप्रिय होता. त्याने अनेक असे आर्टिकल लिहिले होते जे मोठमोठ्या कलाकारांची पोलखोल करत. त्यात मुख्यतः तामिळ चित्रपटसृष्टीच्या एका सुपरस्टारचा देखील समावेश होता. मद्रास राज्यात झालेल्या या हत्येने खळबळ उडाली होती. आता ती कथा आपल्याला वेबसीरिजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

Jul 25, 2022, 05:32 PMIST

CWG 2022 : स्पर्धेपूर्वी भारताला पुन्हा एकदा डोपिंगचा झटका, अजून एक खेळाडू स्पर्धेबाहेर

राष्ट्रकुल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ४०० मीटर रिले शर्यतीतील महिला संघाची एक खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे. यानंतर तिला संघातून वगळण्यात आले आहे. डोप चाचणीतील दोषी खेळाडूचे नाव मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने उघड केलेले नाही. दरम्यान, या खेळाडूसह आतापर्यंत एकूण तीन भारतीय खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत.

Jul 25, 2022, 05:24 PMIST

Arjun Khotkar: अर्जुन खोतकर यांनी पाठिंबा दिल्याचा एकनाथ शिंदे गटाचा दावा

शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिल्लीत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते शिंदे गटात सहभागी झाल्याची चर्चा आहे. शिंदे गटात सहभागी झालेलो नाही, असं अर्जुन खोतकर म्हणत असले तरी शिंदे गटानं पत्रक प्रसिद्ध करून खोतकर आमच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

Jul 25, 2022, 05:11 PMIST

Loksabha Session: काँग्रेसचे चार खासदार संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित

महागाई विरोधात निदर्शनं केल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशन काळापुरता निलंबित करण्यात आलं आहे. मनीकम टागोर, रम्या हरिदास, ज्योतिमनी आणि टी. एन. प्रतापन यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.

Jul 25, 2022, 05:07 PMIST

टाटा मोटर्स दिल्ली सरकारला १५०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार

टाटा मोटर्स येत्या १२ वर्षाच्या काळात दिल्ली सरकारच्या दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला (डीटीसी) १५०० वातानुकूलित, लो-फ्लोअर, १२-मीटर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार आहे. यासंबंधी नुकताच करार करण्यात आला. ‘दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्‍यामध्‍ये याची मदत होईल’ अशी माहिती टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष रोहित श्रीवास्तव यांनी दिली

टाटा मोटर्स दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला (डीटीसी) १५०० वातानुकूलित बसेसचा पुरवठा करणार

टाटा मोटर्स दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला (डीटीसी) १५०० वातानुकूलित बसेसचा पुरवठा करणार

Jul 25, 2022, 04:43 PMIST

नवी मुंबईत मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली नाईक कुटुंबीयांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा नवी मुंबई दौरा. ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक आणि नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट

Amit Thackeray Navi Mumbai tour

Amit Thackeray Navi Mumbai tour

Jul 25, 2022, 04:32 PMIST

हवामान खात्याचे अंदाज सपशेल चुकले- अजित पवार

काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला होता, त्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी दिली, परंतु हवामान खात्याचा अंदाज सपशेल चुकीचा ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हवामान खात्यावर केली आहे.

Jul 25, 2022, 04:25 PMIST

Ajit Pawar: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे काही ताम्रपट घेऊन आलेले नाहीत - अजित पवार

एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारनं सुरू केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा दणका उडवून दिला आहे. त्याची काहीच गरज नव्हती, करण शिंदे स्वत: आमच्या सरकारमध्ये होते. विकासाची कामं बंद करणं बरोबर नाही. ही वैयक्तिक कुणाच्या दारातली किंवा घरातली कामं नव्हती. वडु इथंं संभाजी महाराजांंच्या स्मारकासाठी २६५ कोटींचा आराखडा तयार केला होता, तो रद्द केला गेला. राजर्षी शाहु महाराजांच्यासाठी निधी दिला होता. तोही रद्द केला गेला. शिंदे आणि फडणवीस ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. त्यांचंही सरकार कधी तरी जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

Jul 25, 2022, 04:16 PMIST

Ajit Pawar on Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार न होणं हा महाराष्ट्राचा अपमान - अजित पवार

मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही? ते करायला कुणी अडवलं आहे? राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीचे दौरे करावेत, पण राज्यातील जनतेकडंही पाहावं, असा टोला अजित पवार यांनी हाणला.

Jul 25, 2022, 04:13 PMIST

Ajit pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू

राज्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. हे सगळं सरकार दरबारी मांडण्याचं सर्वात उत्तम ठिकाण हे विधिमंडळाचं अधिवेशन असतं. पण सरकार अधिवेशनच घेत नाही. बहुमत असताना सरकार असं का वागतंय?, असा सवाल अजित पवार यांनी केला.

Jul 25, 2022, 04:12 PMIST

Eknath Shinde in Delhi: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल - एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला वगैरे नाही. लवकरच विस्तार होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हटलं आहे. महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Jul 25, 2022, 04:02 PMIST

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. मुंबईतील जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यावर पुढील दोन आठवडे कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयानं महापालिकेला दिले आहेत. राणे यांनीही बंगल्याच्या जागेवर कुठलंही नवं बांधकाम करू नये, असंही न्यायालयानं बजावलं आहे.

Jul 25, 2022, 02:07 PMIST

Ajit Pawar: अतिवृष्टीग्रस्त भागांत ओला दुष्काळ जाहीर करा - अजित पवार

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांत ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Jul 25, 2022, 02:07 PMIST

Arjun Khotkar: अद्याप एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेलो नाही - अर्जुन खोतकर

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी शिवसेनेतच आहे. अद्याप एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेलो नाही. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. वेगवेगळ्या कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते - अर्जुन खोतकर

Jul 25, 2022, 12:56 PMIST

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

Plane Crashed in Indapur Pune : पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीत एक शिकाऊ विमान कोसळलं आहे. सुदैवानं या विमान अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही, परंतु विमानातील पायलट तरुणीला किरकोळ जखम झाली आहे. त्यामुळं पायलटला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jul 25, 2022, 12:49 PMIST

जम्मू-काश्मिरमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक; राजनाथ सिंहांनी दिले संकेत

Jammu Kashmir Assembly Election : जम्मू आणि काश्मिरमध्ये लवकरच विधासभा निवडणूक होणार असल्याचे संकेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचेही आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री कारगिल विजय दिनानिमित्त जम्मूत आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Defence Minister Rajnath Singh

Defence Minister Rajnath Singh (HT)

Jul 25, 2022, 12:41 PMIST

Arjun Khotkar: माजी मंत्री अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात

माजी मंत्री व शिवसेनेचे मराठवाड्यातील प्रभावी नेते अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. भाजप व शिवसेना युतीच्या काळात खोतकर यांच्याकडं राज्यमंत्री पद होते.

Jul 25, 2022, 12:41 PMIST

Kolhapur Shiv Sena: खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला आहे. माने हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यामुळं जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संताप आहे. त्यातूनच हा मोर्चा काढण्यात आला आहे. माने हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jul 25, 2022, 11:31 AMIST

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 'जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगानं कारवाई करू नये', अशी भुमिका शिवसेनेनं याचिकेतून घेतली आहे.

Jul 25, 2022, 11:13 AMIST

State Election Commission: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे आज सायंकाळी ४ वाजता  मंत्रालयातील पत्रकार कक्षात बैठक घेणार आहेत. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालायनं नुकतीच मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे.

Jul 25, 2022, 10:42 AMIST

Aarey Road: मेट्रो कारशेडच्या कामासाठी आरे रोड पुढचे २४ तास बंद

एमएमआरसी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळं रात्री १२ पासून पुढील २४ तासांसाठी आरे रोड वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पवई/मरोळ येथे ये जा करण्यासाठी जेव्हीएलआर मार्गाचा वापर करावा, असं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

Jul 25, 2022, 10:26 AMIST

Draupadi Murmu takes oath: माझं राष्ट्रपतीपद हे देशातील प्रत्येक गरीब नागरिकाचं यश - द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती पद मिळणं हे माझं व्यक्तिगत यश नाही. देशाच्या प्रत्येक गरीब नागरिकाचं हे यश आहे. प्रगतीच्या वाटेवर चालत असलेल्या देशाचं राष्ट्रपतीपद भूषवणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. जगात लोकशाहीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या देशाच्या उज्ज्वल परंपरेचा मी एक भाग होत आहे याचा अभिमान आहे. पूर्ण निष्ठेनं मी माझं कर्तव्य पार पाडेन - द्रौपदी मुर्मू

Jul 25, 2022, 10:26 AMIST

Draupadi Murmu Speech: स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी काम करायचं आहे - द्रौपदी मुर्मू

देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याकडून जी अपेक्षा केली होती, त्या अपेक्षापूर्तींसाठी आपल्याला काम करायचं आहे. भारताच्या उज्ज्वल भवितव्याची विकास यात्रा सर्वांनी मिळून करायची आहे. - द्रौपदी मुर्मू

Jul 25, 2022, 10:20 AMIST

Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भाषण सुरू

मतदानाबद्दल द्रौपदी मुर्मू यांनी आमदार व खासदारांचे आभार मानले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना माझी राष्ट्रपतीपदी निवड हे भाग्य समजते. देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि आज अमृतमहोत्सव सुरू असताना मला ही मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Jul 25, 2022, 10:15 AMIST

Draupadi Murmu: द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

Jul 25, 2022, 09:39 AMIST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईत धनगर समाजातर्फे सत्कार

मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनगर मेळावा आयोजित करण्यात आला होता. धनगर समाजातर्फे यावेळी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा दिल्या जातील, असं शिंदे यावेळी म्हणाले

धनगर समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार

धनगर समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार

Jul 25, 2022, 09:37 AMIST

Share Market: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मागील काही दिवसाच्या तेजीनंतर आज, आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी तर निफ्टी ६३ अंकांनी घसरला आहे.

Jul 25, 2022, 08:54 AMIST

Draupadi Murmu: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची महात्मा गांधींना श्रद्धांजली

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली.

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (फोटो - एएनआय)

Jul 25, 2022, 08:38 AMIST

Uttar Pradesh Accident: पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील पूर्वांचाल एक्सप्रेस वेवर बाराबंकी इथं पहाटे भीषण अपघात झाला. दोन डबल डेकर बसच्या धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

Jul 25, 2022, 08:11 AMIST

खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरातील घरावर शिवसैनिक काढणार मोर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले खासदार धैर्यशिल माने यांना जाब विचारण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांकडून आज त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार माने यांच्या कोल्हापूरातील घराच्या समोर शिवसैनिक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. माने सध्या दिल्लीत असून त्यांनी समर्थकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

Jul 25, 2022, 07:29 AMIST

Draupadi Murmu President Elect: द्रौपदी मुर्मू घेणार राष्ट्रपती पदाची शपथ

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा ५ वर्षांचा राष्ट्रपतीपदाचा काळ संपला असून त्यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणार आहेत. आज त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.

शेअर करा