मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 18 August 2022 Live: राष्ट्रवादीच्या ५ बड्या नेत्यांना ईडीची नोटीस, भाजप खासदाराचा दावा
Live Blog

Marathi News 18 August 2022 Live: राष्ट्रवादीच्या ५ बड्या नेत्यांना ईडीची नोटीस, भाजप खासदाराचा दावा

Aug 18, 2022, 11:41 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 18, 2022, 11:41 PMIST

राष्ट्रवादीच्या पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस, भाजप खासदाराचा दावा

राष्ट्रवादीच्या पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार असल्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती ईडीची कारवाई होणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सांगत आहेत. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारात राष्ट्रवादीच्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे. 

Aug 18, 2022, 06:32 PMIST

राज्यात चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य शासनाने आज चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत

  • राज्याचे महिला व बाल कल्याण आयुक्त राहुल रंजन हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त असतील.
  • नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांची राज्याच्या महिला व बाल कल्याण आयुक्त म्हणून पुणे येथे बदली करण्यात आली.
  • नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली
  • मुंबई महागनर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सह आयुक्तराहुल कर्दिळे यांची वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

<p>IAS transfer</p>
IAS transfer

Aug 18, 2022, 05:29 PMIST

भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी 'सद्भावना' दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार सुनील शेळके, नायब तहसीलदार श्रावण ताते उपस्थित होते.

Aug 18, 2022, 03:07 PMIST

pune crime : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; एकाला अटक

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत येरवडा पोलिसांनी एकास अटक केली आहे. साहील सत्यवान आल्हाट (वय २२, रा. गांधीनगर, येरवडा) याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि आल्हाट ओळखीचे आहेत. आल्हाटने तरुणीशी मैत्री केली. तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तरुणीवर त्याने बलात्कार केला. आल्हाटने त्याच्या नात्यातील एका महिलेच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.

Aug 18, 2022, 02:10 PMIST

Jammu Kashmir: फारुख अब्दुल्ला यांनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

बाहेरील नागरिकांना देखील जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाचा अधिकार देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे राजकीय पडसाद काश्मीरमध्ये उमटत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी या निर्णयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.

Aug 18, 2022, 01:45 PMIST

Nashik Central Jail : नाशिकच्या कारागृहात कैद्यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण!

Nashik Central Jail Crime News : नाशिकमधील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्हांत तुरुंगवास भोगत असलेल्या कैद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही कैद्यांनी त्यांचं बॅरेक बदललं होतं, त्याचा जाब पोलीस कर्मचाऱ्यानं विचारताच कैद्यांनी पोलीस कर्मचारी असलेल्या प्रभू चरण पाटील यांना मारहाण केली आहे.

Aug 18, 2022, 01:45 PMIST

Jayakwadi Dam Aurangabad : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; ७२ हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू!

Jayakwadi Dam Water Level Today : गेल्या ४८ तासांपासून नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं आता जायकवाडी धरणातून ७२ हजार क्यूसेक वेगानं पाणी सोडण्यात आहे. धरणाचे १८ दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळं आता प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Aug 18, 2022, 01:24 PMIST

Tejashwi Yadav: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

आम्हाला बदनाम करण्याखेरीज भाजपकडं दुसरं कुठलंही काम नाही. आमच्या सरकारनं राज्यातील बेरोजगारांना १० लाख रोजगार देण्याची घोषणा केल्यापासून भाजप अस्वस्थ झाली आहे, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे.

Aug 18, 2022, 01:21 PMIST

Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची दुसरी उमेदवार यादी जाहीर 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून ९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. चालू वर्षाअखेर गुजरातमध्ये निवडणुका होत असून आम आदमी पक्ष यात तयारीनं उतरणार आहे.

Aug 18, 2022, 12:42 PMIST

Pune Rain : पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या पाच वर्षांत सन २०१९ चा अपवाद वगळता एवढ्या लवकर चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. या पाण्यामुळे पुढील वर्षभराची पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांत मिळून २९.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Aug 18, 2022, 11:58 AMIST

Monsoon Session : 'अवैध गर्भपातामुळं बीड जिल्हा प्रसिद्ध', भाजप आमदाराच्या विधानानं सभागृहात गोंधळ!

Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Live : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कामकाज सुरू असताना भाजपच्या आमदार आमदार भारती लव्हेकर यांनी 'अवैध गर्भपातामुळंच बीड जिल्हा प्रसिद्ध' असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

Aug 18, 2022, 11:25 AMIST

Maharashtra Politics : फडणवीसांचा सागर बंगला म्हणजे वॉशिंग मशिन; बाळासाहेब थोरातांचा चिमटा!

DCM Devendra Fadnavis vs Balasaheb Thorat : फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यावर आता कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी 'उपमुख्यमंत्र्यांचा सागर बंगला वॉशिंग मशीनसारखं काम असल्याची' टीका केली आहे.

Aug 18, 2022, 10:49 AMIST

Pune MAHADA lottery result: पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार २११ घरांची सोडतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरवात 

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला. विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल २७८ सदनिका, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

<p>म्हाडा लॉटरी निकाल&nbsp;</p>
म्हाडा लॉटरी निकाल&nbsp;

Aug 18, 2022, 10:30 AMIST

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स १०० अंकांनी कोसळला

गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक ट्रेंड दाखवणाऱ्या शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी कोसळला असून निफ्टीही ४० अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.

Aug 18, 2022, 09:24 AMIST

Hanumangarh Crime News : राजस्थानमध्ये साधुची राहत्या घरात निर्घृण हत्या; आरोपी फरार

Rajasthan Crime News : राजस्थानमधील उदयपूर हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता हनुमानगडमध्ये एका साधुची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. चेतन दास असं मयत साधुचं नाव असून आरोपींनी त्यांचा राहत्या घरी खून केल्यानंतर ते फरार झाले आहेत. त्यामुळं आता पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

Aug 18, 2022, 08:44 AMIST

Jammu and Kashmir: लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा, सुरक्षा दलाला यश

जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ठार झालेला दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडून शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे.

Aug 18, 2022, 07:48 AMIST

Maharashtra Rain: भंडारा, गोंदिया आणि नागपूरमध्ये पूरस्थिती; २ दिवसात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

राज्यातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

Aug 18, 2022, 07:43 AMIST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झालीय. पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आज विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

    शेअर करा