मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : धंद्यासाठी प्रथम नोटा मोजता येणे पुरेसे...

Business Ideas : धंद्यासाठी प्रथम नोटा मोजता येणे पुरेसे...

HT Marathi Desk HT Marathi

Feb 29, 2024, 06:47 PM IST

  • Business Ideas : माणसाने संधी मिळताच शिकावे. शाळा-महाविद्यालयांत पुस्तकी शिक्षण मिळते, पण आव्हानांवर मात करण्यास गरजेचे शिक्षण अनुभवांतूनच मिळवावे लागते.

How to build a successful business- Dhananjay Datar

Business Ideas : माणसाने संधी मिळताच शिकावे. शाळा-महाविद्यालयांत पुस्तकी शिक्षण मिळते, पण आव्हानांवर मात करण्यास गरजेचे शिक्षण अनुभवांतूनच मिळवावे लागते.

  • Business Ideas : माणसाने संधी मिळताच शिकावे. शाळा-महाविद्यालयांत पुस्तकी शिक्षण मिळते, पण आव्हानांवर मात करण्यास गरजेचे शिक्षण अनुभवांतूनच मिळवावे लागते.

धनंजय दातार (व्यवस्थापकीय संचालक अदिल ग्रूप)

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

व्यवसायाचे क्षेत्र असे गंमतीशीर आहे, की येथे प्रवेशासाठी तुम्हाला व्यवहारज्ञानाखेरीज कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची गरज नसते. एकवेळ नोकरीसाठी उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले जात असेल पण व्यवसायात मात्र कष्टाची तयारी असणारा सामान्य माणूसही यशस्वी होऊ शकतो. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास धंद्यासाठी सुरवातीला केवळ नोटा मोजता येणे पुरेसे असते. तरुणाईच्या विशीत केवळ बारावी पास या पात्रतेवर दुबईत गेल्यावर प्रारंभी मला माझ्या कमी शिक्षणाची लाज वाटत असे. परंतु नंतर मला आढळले, की दुबईतील अतिश्रीमंत भारतीय व्यापाऱ्यांत किंवा व्यावसायिकांत बरेचसे लोक अल्पशिक्षित आणि काहीजण तर निरक्षर होते. पण धंद्यात म्हणाल तर एकदम मुरब्बी. त्यातले एक धनाढ्य गृहस्थ असे होते, की जे कोट्यवधींचे व्यवहार हाताची बोटे मोजून करत आणि चेकवर सही करण्यापुरती अक्षरे त्यांनी गिरवून-घटवून शिकून घेतली होती. बाकी त्यांना लिहिता काही येत नव्हते. आमच्या पहिल्या भेटीत त्यांनी सहज विचारले, ‘काय रे मुला! किती शिकलायस?” त्यावर मी थोडा संकोचून ‘बारावी पास झालोय’ असे उत्तर दिले. त्यावर माझ्याकडे कौतुकाने बघत ते म्हणाले, ‘अरे खूपच शिकलायस की. बरं आता माझे एक काम कर.’ त्यांनी चेकबुक काढले आणि मला चेकवरील तपशील लिहायला लावला. अक्षरी लिहिलेली संख्या अंकात किती लिहिलीय हे मला वाचून दाखवायला लावले. मग हाताची बोटे मिटून मनाशी हिशेब केला आणि त्या चेकवर गिचमिड सही केली. पुढे मी ज्यावेळी त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते माझ्याकडून चेक लिहून व वाचून घेत.

पण एका गोष्टीचे मात्र मला वाईट वाटे. त्यांचे कर्मचारी आपल्या मालकाच्या पाठीमागे त्यांच्या निरक्षरपणाची चेष्टा करत असत. ‘काला अक्षर भैस बराबर,’ किंवा ‘अनपढ’ असे म्हणून कुत्सितपणे हसत. त्या गृहस्थांसोबत विश्वासाचे नाते जुळल्याने एका भेटीत मी स्पष्टपणे त्यांना या प्रकाराबाबत विचारले. ते हसले आणि म्हणाले, ‘जय बेटा! मला कल्पना आहे. माझ्यामागे माझेच लोक मला निरक्षर म्हणतात. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. साधी गोष्ट आहे. मी धंदा करण्यासाठी जन्मलो आहे आणि ते लोक नोकरी करण्यासाठी. मला नोटा मोजता येतात आणि नफ्याच्या संधी शोधता येतात तितके पुरेसे आहे. मी अशिक्षित असेन तर मग हे भरपूर शिकलेले लोक माझ्या हाताखाली पगारी नोकर का राबतात? उच्च शिक्षणाच्या बळावर स्वतः उद्योग का नाही उभारत? याचाच अर्थ माझ्याकडे असे काही खास कौशल्य नक्कीच आहे जे यांना जमू शकत नाही.’ त्यांचे म्हणणे अगदी खरे होते.

आजही हे गृहस्थ दुबईच्या व्यापारी वर्तुळात अत्यंत अनुभवी आणि यशस्वी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि पूर्वी ते कोट्यधीश होते. आता तर अब्जाधीशही झाले आहेत. ज्यांना धंद्याची आकांक्षा आहे, परंतु शिक्षण कमी असल्याचा संकोच वाटतो, त्यांना मी खेड्या- पाड्यांतील महिलांचे उदाहरण देतो. आठवडी बाजारात धान्य, भाज्या किंवा घरी बनवलेल्या वस्तू विकणाऱ्या महिलांकडे बघा. त्या एकवेळ पुस्तकी गणित शिकल्या नसतील, पण त्यांना नोटा व्यवस्थित मोजता येतात, नोटांवर छापलेली किंमत ओळखता येते आणि छटाक-अधपाव, चिपटं-मापटं, पावशेर-शेर म्हणजे नक्की किती प्रमाण हेही ठाऊक असते. त्या हाताच्या बोटांवर हिशेब करतात, पण खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत कधीच फसत नाहीत. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि कमी शिक्षणाचे कारण देत स्वतःमधील धंदा करण्याची उर्मी मारुन टाकू नये.

मी माझ्या आईचे उदाहरण देतो. गरीबीमुळे तिचे शालेय शिक्षण फारसे झाले नव्हते. पण अल्पशिक्षीत असल्याने आईचे कुठेही अडले नाही. तिने संसार उत्तम करुन दाखवलाच, पण मलाही व्यवहारज्ञान शिकवले. मी खरेदीची कला माझ्या आईकडून शिकलो आहे. ती बाजारात जाताना मला बरोबर घेऊन जायची. तिची बाजार करण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गेल्या-गेल्या घाईने भाजीपाला खरेदी करायची नाही. आधी बाजाराच्या दुसऱ्या टोकापर्यंत नुसती चक्कर मारायची. ताज्या भाज्या कुणाकडे आहेत, त्यांचे दर काय आहेत, घासाघीस करायला कुठे वाव आहे, हे ती या फेरीत लक्षात ठेवायची आणि परत येताना चांगली भाजी स्वस्तात पदरात पाडून घ्यायची. मी तीच पद्धत व्यवसायात अनुसरली आणि फायद्यात राहिलो.

मित्रांनोऽ पण याचा अर्थ उच्च शिक्षणाला महत्त्व नाही असा मात्र होत नाही. माणसाने संधी मिळताच शिकावे. मला एवढेच सांगायचे आहे, की शाळा-महाविद्यालयांत पुस्तकी शिक्षण मिळते, पण आव्हानांवर मात करण्यास गरजेचे शिक्षण अनुभवांतूनच मिळवावे लागते. रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्या एका कवितेतील ‘बोला हवे ते मला काय त्याचे? पुरे जाणतो मीच माझे बल’ ही आठवून न्यूनगंड न बाळगता स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

पुढील बातम्या