मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas: मोका देखके चौका मारनेका...

Business Ideas: मोका देखके चौका मारनेका...

HT Marathi Desk HT Marathi

Mar 30, 2024, 05:13 PM IST

  • क्रिकेटच्या सामन्यात एखादा संघ अडचणीत आल्यास त्यातील अनुभवी खेळाडू संयमाने खेळपट्टीवर पाय रोवून किल्ला लढवतात. येणारा प्रत्येक चेंडू ते तटवून एकेरी-दुहेरी धावा जमवतात आणि संधी मिळताच चौकार मारतात. यालाच म्हणतात ‘मोका देखके चौका मारनेका’. 

Business Idea in Marathi - How to turn opportunity into success

क्रिकेटच्या सामन्यात एखादा संघ अडचणीत आल्यास त्यातील अनुभवी खेळाडू संयमाने खेळपट्टीवर पाय रोवून किल्ला लढवतात. येणारा प्रत्येक चेंडू ते तटवून एकेरी-दुहेरी धावा जमवतात आणि संधी मिळताच चौकार मारतात. यालाच म्हणतात ‘मोका देखके चौका मारनेका’.

  • क्रिकेटच्या सामन्यात एखादा संघ अडचणीत आल्यास त्यातील अनुभवी खेळाडू संयमाने खेळपट्टीवर पाय रोवून किल्ला लढवतात. येणारा प्रत्येक चेंडू ते तटवून एकेरी-दुहेरी धावा जमवतात आणि संधी मिळताच चौकार मारतात. यालाच म्हणतात ‘मोका देखके चौका मारनेका’. 

दुबईत दुकान सुरु करुन आम्हाला सहा वर्षे झाली होती. प्रारंभीच्या नुकसानीतून सावरुन धंद्याची नेटकी घडी बसली होती. मीही व्यवहार सांभाळायला बऱ्यापैकी सक्षम झाल्याने बाबा माझ्यावर अधिकाधिक जबाबदारी सोपवत होते. बराचसा काळ ते मुंबईत आईसोबत राहात आणि अधून-मधून दुबईला चक्कर मारुन एकंदर व्यवहारांवर देखरेख ठेवत. संकटांनी मात्र याच काळात माझी परीक्षा घ्यायचे ठरवले होते. एका अडचणीतून सुटून सुस्कारा सोडतो न सोडतो तोवर दुसरे संकट अकस्मात माझ्यापुढे उभे राहिले. २ ऑगस्ट १९९० रोजी इराकने कुवेतवर हल्ला करुन त्या देशात सैन्य घुसवले आणि आखाती प्रदेशात युद्धाचे वादळ घोंगावू लागले. इराकविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय आघाडीत माझी कर्मभूमी असलेला संयुक्त अरब अमिरात (युएई) हा देशही सहभागी झाला.

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

दुबई हे अमिरातीतील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याने इराकी विमानांचा हल्ला त्यावर होण्याची शक्यता जास्त होती. युद्धाच्या भीतीने दुबईत खळबळ उडाली. रात्री ब्लॅकआऊट जारी झाला, तर दिवसा इशाऱ्याचे भोंगे वाजू लागले. नागरी जीवनाइतकेच दुबईतील व्यापारी विश्वही ढवळून निघाले. मी तेथे एकटाच राहून आमचे दुकान सांभाळत होतो. गणेशोत्सवापासून पुढचे चार महिने नवरात्र, दिवाळी, नाताळ अशा सणासुदीचे असल्याने त्या काळात ग्राहकांची संख्या आणि मागणी वाढती असते, हा आडाखा बांधून मी जून-जुलैतच गोदामांत मोठ्या प्रमाणात माल भरुन ठेवला होता.

एकतर आमच्या धंद्याचा जीव लहानसा, त्यात पुन्हा पदरचे सर्व पैसे खर्चून मालखरेदी केलेली. हवाई हल्ल्यात माझे नुकसान झाले असते तर मी अक्षरशः रस्त्यावर येणार होतो. मी प्रचंड दडपणाखाली आलो. पुढे काय होणार, या काळजीने रात्रीची झोप उडली. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी किंवा युगांडातील हुकूमशाहीत जसे अनेकांना चीजवस्तू मागे ठेऊन केवळ अंगावरच्या कपड्यानिशी भारतात परतावे लागले होते, तसेच आपल्याला भोगावे लागते की काय, हा विचार सारखा मनात येऊ लागला. माझ्यासारखे अनेक छोटे व्यावसायिक धास्तीमुळे अन्य देशांमध्ये आश्रय घेत होते. मला मात्र कोणाचाच आधार नव्हता. अखेर ‘जे काय व्हायचे ते होऊ दे,’ असे मनाला बजावून मी दुबईत खंबीरपणे थांबून राहण्याचा निर्णय घेतला.

‘सबुरी का फल मीठा’, या म्हणीचा प्रत्यय मला आला. परिस्थितीला अनपेक्षित वेगळे वळण मिळाले. युद्धाच्या भीतीने दुबईतील रहिवाशांनी घरात जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर साठवायला सुरवात केली. माझ्या दुकानांत एकाएकी गर्दी वाढली. रात्री बारा वाजले तरी दुकानापुढची ग्राहकांची रांग संपेना. बघता बघता मी गोदामात साठवलेला जादाचा मालसाठा संपून गेला. आई-वडिलांच्या संस्कारामुळे मी या स्थितीतही ग्राहकांशी प्रामाणिकपणे वागलो. माझ्याजागी एखादा संधीसाधू व्यापारी असता तर त्याने परिस्थितीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा भावात वस्तू विकून उखळ पांढरे करुन घेतले असते, परंतु मी माझ्याकडील माल एरवीच्याच रास्त दराने लोकांना विकला. तरीही एकंदर हिशेब करता मला नेहमीच्या तुलनेत भरपूर नफा झाला होता. मी परमेश्वराचे आभार मानले.

संयमाचे महत्त्व

माझ्या एका मित्राचे सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान होते, पण मनाजोगते चालत नसल्याने तो निराश झाला होता. ‘आजच्या तरुणाईला बाइकचे आणि कारचे वाढते आकर्षण असल्याने सायकलच्या धंद्यात काही राम राहिला नाही आणि दुकान चालेल याची खात्री नाही,’ असे तो उद्वेगाने मला म्हणत असे. त्यावर मी त्याला संयम बाळगण्यास सांगितले आणि दुकान बंद न करता उलट त्याचे आधुनिकीकरण करण्याचा सल्ला दिला. माझा अदमास खरा ठरेल अशा घडामोडी घडताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उत्तमोत्तम सायकली बाजारात येत आहेत, त्यांच्या किंमती दहा हजारांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत आहेत आणि आबालवृद्ध फिटनेससाठी पुन्हा एकदा सायकलिंगकडे वळत आहेत. आता वाहन म्हटले म्हणजे त्याची दुरूस्ती व देखभाल आलीच. समजलं ना यात किती मोठी संधी आहे ते?

मित्रांनो! व्यवसायात समस्या येतातच. त्यातील केवळ दहा टक्के समस्या आपोआप सुटतात, पण उरलेल्या ९० टक्के समस्या मात्र आपल्यालाच तटवाव्या लागतात. विकेट राखण्यासाठी प्रत्येक चेंडू संयमाने खेळून काढण्याचे आणि संधी मिळताच चौकार मारण्याचे कौशल्य शिकावे लागते. समर्थ रामदासांनी सांगितल्यानुसार -

धीर धरा, धीर धरा तकवा। हडबडू गडबडू नका।

काळ देखोन वर्तावे। सांडावे भय पोटीचे॥

पुढील बातम्या