मराठी बातम्या  /  निवडणुका  /  पुण्यात येऊन मोदींची पवारांवर बोचरी टीका; महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा, स्वप्न पूर्ण न झाल्यानं भटकतोय

पुण्यात येऊन मोदींची पवारांवर बोचरी टीका; महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा, स्वप्न पूर्ण न झाल्यानं भटकतोय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 29, 2024 08:28 PM IST

Narendra Modi In Pune : नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, स्वप्न पूर्ण न झाल्यानं त्यांचा आत्मा भटकतोय, त्यांनी आपला स्वत:चा पक्षही अस्थिर केला आहे.

पुण्यात येऊन मोदींची पवारांवर बोचरी टीका
पुण्यात येऊन मोदींची पवारांवर बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी, इंडिया आघाडी तसेच शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, स्वप्न पूर्ण न झाल्यानं त्यांचा आत्मा भटकतोय, त्यांनी आपला स्वत:चा पक्षही अस्थिर केला आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.  गरीबी कधी हटवणार,  भारत विकसित कधी बनणार, असं विचारलं तर राहुल गांधी म्हणतात खटाखट.. खटाखट.. असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या प्रचारार्थ सभा पार पडली. पुणे तिथे काय उणे. या भूमीवर महात्मा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढं प्राचीन आणि तेवढंच फ्युचरिस्टिट आहे, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. 

मोदींची पुण्यात पुणे, शिरुर, बारामती व मावळ या चार लोकसभा मतदारसंघासाठी एकत्रित प्रचारसभा झाली.

मोदी म्हणाले की, गेल्या६० वर्षात काँग्रेसने देशातील नागरिकांना मुलभूत सुविधाही पुरवल्या नाहीत. मात्र गेल्या १० वर्षातच आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा दिल्या. देशात लवकरच बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. केवळ १० वर्षांत सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्ट अप सुरू केले आहेत. यातील अनेक स्टार्ट अप पुण्यातील आहेत. १० वर्षांपूर्वी भारतात मोबाईलची आयात केली जात होती. पण आता आपण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत. भारताला सेमीकंडक्टर, इनोव्हेशन, एनर्जी हब बनवायचे आहे.

गेल्या दहा वर्षात देशातील महागाई नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले आहे. देश आज सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. देशातील ७० वर्षांवरील नागरिकांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच औषधेही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जातील. सरकारने सर्वसामान्यांसाठी देशातील बँकांचे दरवाजे उघडले आहेत. छोट्या व्यावसायिकांना विना जामीन कर्जांचे वाटप करण्यात आल्याचा दावा मोदींनी केला.

शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल -

मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला. ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या  खेळाची सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या कुटूंबालाही अस्थिर करत आहेत. १९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर  त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे, अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली.

WhatsApp channel