Raj Thackeray : मोदींसाठी महायुतीला बिनर्शत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का; कार्यकर्ते कामाला लागले, पण..
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray : मोदींसाठी महायुतीला बिनर्शत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का; कार्यकर्ते कामाला लागले, पण..

Raj Thackeray : मोदींसाठी महायुतीला बिनर्शत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का; कार्यकर्ते कामाला लागले, पण..

Apr 29, 2024 04:36 PM IST

Raj Thackeray News : ठाणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहापूरमध्ये राज ठाकरे यांना धक्का देत कार्यकर्ते चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरेंना धक्का; कार्यकर्ते लागले कामाला, पण महाविकास आघाडीच्या
राज ठाकरेंना धक्का; कार्यकर्ते लागले कामाला, पण महाविकास आघाडीच्या

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवतीर्थावरून मोठी घोषणा करत केवळ मोदींनी पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर पक्षकार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यात राज ठाकरे यांना धक्का देत कार्यकर्ते चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला खरा, मात्र कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचला नसल्याचे दिसत आहे. शहापूरमधील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडणूक लढवत आहेत. बाळ्या मामाच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात शहापूर तालुक्यातून करण्यात आली. यावेळी दिलेल्या दृष्याने सर्वांनाच धक्का बसला. म्हात्रे यांची शहापूर शहरात एन्ट्री होताच मनसेचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यासह तब्बल ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी म्हात्रे यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचं जोरदार स्वागत केलं. या कार्यकर्त्यांनी सांगितले की. जरी आम्ही मनसेचे कार्यकर्ते असलो तरी देखील आम्ही सुरेश म्हात्रे यांचे समर्थक आहोत. त्यामुळे आमचा पाठिंबा म्हात्रे यांनाच असणार आहे, असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. 

दरम्यान दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदर दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही महायुतीत सामील होऊ शकतात, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावर मनसेकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. अखेर मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केली.

राज ठाकरेंनी म्हटले की, केवळ पंतप्रधान मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत. तसेच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे. मात्र राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसेचे काही कार्यकर्ते नारज असल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच आता मनसे कार्यकर्ते अनेक मतदारसंघात महायुतीच्या विरोधात प्रचार करत असल्याचे चित्र आहे.

Whats_app_banner