मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : काँग्रेसला धक्का; उमेदवाराने शेवटच्या क्षणी नामांकन मागे घेतले अन् केला भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election : काँग्रेसला धक्का; उमेदवाराने शेवटच्या क्षणी नामांकन मागे घेतले अन् केला भाजपमध्ये प्रवेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 29, 2024 08:00 PM IST

Indore Loksabha Election : इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपची सुरतनंतर आणखी एक जागा सेफ झाली आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का
इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये सूरतची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय कांती बम (akshay kanti bam) यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आता इंदूरमधून भाजपसमोरचे काँग्रेसचे आव्हान संपले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आशीष सिंह यांनी म्हटले की, काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपले नामांकन मागे घेतले आहे. आमदार रमेश मेंदोला यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, अक्षय बम आपल्या खुशीने भाजपमध्ये आले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होत होती.

ट्रेंडिंग न्यूज

अक्षय बम भाजप कार्यालय पोहोचले. तेथे उपमुख्‍यमंत्री जगदीश देवडा आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांचे स्‍वागत केले गेले. अक्षय बम यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेस कार्यालयात भयान शांतता पसरली आहे. इंदूर विधानसभा लढववत असलेले काँग्रेस उमेदवार राजा मांधवानी यांनही अक्षय यांच्यासोबत भाजपचा हात पकडला आहे. मुख्‍यमंत्री मोहन यादव आणि माजी सीएम श‍िवराज सिंह चौहान यांनी दोघांचे स्वागत केले.

भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबतचा एक सेल्फी शेअर करत म्हटलं आहे की, बम यांचं भाजपमध्ये स्वागत आहे.इंदूरच्या लोकसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसला याबाबतची खबर लागण्याआधीच भाजपकडून हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आलं. इंदूरमध्ये चौथ्या टप्प्यात१३मे रोजी मतदान होणार आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसच्या अक्षय बम यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर म्हटले की, जर काँग्रेस उमेदवाराने आपले नामांकन मागे घेतले तर आम्ही काय करू शकतो? काँग्रेसनेच गुडघे टेकले तर आम्ही काय करू शकतो.

दरम्यान अक्षय बम यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, काँग्रेस नेत्याला धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, इंदूर लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ९ जणांनी आपले र्ज मागे घेतले आहेत. त्यामध्ये काँग्रेस उमेदवाराचाही समावेश आहे.त्यानंतर आता १४ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. व्हिडियोग्राफीच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवून कारवाई केली जाईल.

भाजपने इंदूर जागेवरून भाजपच्या शंकर लालवानी यांना पुन्हा संधी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अक्षय कांति बम यांना मैदानात उतरवले होते. मात्र त्यांनी निवडणुकीच्या आधीच मैदान सोडले आहे.

WhatsApp channel