मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Vaccine War: 'द वॅक्सीन वॉर'साठी तब्बल एक वर्ष संशोधन केलं! विवेक अग्निहोत्रींकडून टीमच कौतुक

The Vaccine War: 'द वॅक्सीन वॉर'साठी तब्बल एक वर्ष संशोधन केलं! विवेक अग्निहोत्रींकडून टीमच कौतुक

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 23, 2022 02:07 PM IST

The Vaccine War: ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटातून कोरोना महामारी दरम्यान देशातील परिस्थिती कशी होती, याचं वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे.

Vivek Agnihotri
Vivek Agnihotri

The Vaccine War: दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या वास्तववादी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘द वॅक्सीन वॉर’ असं या चित्रपटाचं नाव असून, यात कोरोना महामारी दरम्यान देशातील परिस्थिती कशी होती, याचं वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या टीमने तब्बल एक संपूर्ण वर्ष कोव्हिड परिस्थितीचं निरक्षण करून त्यावर संशोधन केलं आहे. याची माहिती देताना विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या टीमला कौतुकाची थाप दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निर्माते विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी नेहमीच संशोधनावर आधारित चित्रपट बनवण्यावर भर दिला आहे. त्यांचा 'द ताश्कंद फाईल्स'हा चित्रपट देखील अडीच तासांच्या तार्किक चर्चेवर आधारित असून, या चित्रपटाच्या संशोधनासाठी त्यांना बराच वेळ खर्च करावा लागला होता. तर, त्यांचा याच वर्षी रिलीज झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट देखील वास्तववादी घटनांचे चित्रपट करणारा होता. या चित्रपटासाठी देखील त्यांना अनेक वर्षांचे संशोधन करावे लागले होते. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा संवेदनशील विषयावरील चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट कोरोना महामारी, या दरम्यान ऑक्सिजनमुळे लोकांची झालेली वणवण आणि नंतर कोरोनावर आलेली लस यावर आधारित असणार आहे. यासाठी त्यांच्या टीमने ऐन कोरोना संसर्गाच्या काळात सगळ्या परिस्थितीवर निरक्षण आणि संशोधन केले होते. याबाबत बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ‘जेव्हा आपला देश महामारीच्या काळात संघर्ष करत होता, तेव्हा जे चुकीचे होते त्या प्रत्येक गोष्टीवर संशोधन करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत होतो. आमची टीम @i_ambuddha जवळपास एक वर्षाहून अधिक काळ भारताने कोव्हिडशी कसा लढा दिला, यावर संशोधन करत होती. या दरम्यान, आम्हाला असे तपशील मिळाले, जे पाहून प्रत्येकाला आपले शास्त्रज्ञ आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल.’

दिग्दर्शक-निर्माते विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अद्याप त्यावर काम सुरु आहे. या चित्रपटाबद्दलची सगळी माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point