मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth : लेकीच्या हट्टापुढे ‘थलायवा’ही नमले! ऐश्वर्याच्या चित्रपटात कॅमिओ करणार रजनीकांत

Rajinikanth : लेकीच्या हट्टापुढे ‘थलायवा’ही नमले! ऐश्वर्याच्या चित्रपटात कॅमिओ करणार रजनीकांत

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 05, 2022 03:59 PM IST

Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत त्यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतच्या आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहेत.

rajinikanth
rajinikanth

Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत त्यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतच्या आगामी ‘लाल सलाम’ (Lal Salam) या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहेत. नुकतीच निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त अभिनेता विष्णू विशाल आणि विक्रांत संतोष देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतची व्यक्तिरेखा फक्त कॅमिओपुरतीच असणार आहे. मात्र, रजनीकांत यांच्या एका छोट्याशा झलकेसाठी देखील चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

अभिनेते रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ आणि ‘रोबोट 2.0’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणारी प्रॉडक्शन कंपनी ‘लायका’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या मोठ्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी ‘लाल सलाम’ या चित्रपटाचे अनाऊंसमेंट पोस्टर देखील रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये दंगलीत उद्ध्वस्त शहराच्या मध्यभागी क्रिकेट हेल्मेट जळत पडल्याचे दाखवण्यात दाखवले आहे.

ट्विटरवर या चित्रपटाची घोषणा करताना लायका प्रॉडक्शनने म्हटले की, ‘सर्वांना लाल सलाम! सुपरस्टार रजनीकांत यांची विशेष भूमिका असणारा आमचा पुढचा प्रकल्प जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे.’

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हा रजनीकांत यांच्या करिअरमधील 170वा चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत करणार आहे. ऐश्वर्या ही रजनीकांत यांची मोठी मुलगी असून, प्रसिद्ध चित्रपट निर्माती देखील आहे. यापूर्वी ती धनुषसोबत विभक्त झाल्यामुळे प्रचंड चर्चेत आल होती. ऐश्वर्याने कोरोना लॉकडाऊनच्या काळातच रजनीकांत यांना चित्रपटाची कल्पना सांगितली होती. यानंतर ऐश्वर्याने आपल्या डोक्यातील या कल्पनेचे स्क्रिप्टमध्ये रूपांतर केले आणि पटकथा वाचल्यानंतर रजनीकांत देखील लेकीच्या या कथानकाने प्रभावित झाले.

या चित्रपटात क्रिकेटचे हेल्मेट दाखवण्यात आल्याने चित्रपटाला क्रिकेटची पार्श्वभूमी असेल, असा अंदाज बांधला जात आहे. शिवाय या चित्रपटात मुख्य भूमिकेत निवडण्यात आलेले कलाकार देखील क्रिकेट विश्वाशी संबंधित असल्याने चित्रपट देखील अशाच एखाद्या कथेवर आधारित असेल असे कयास बांधले जात आहेत.

IPL_Entry_Point