मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah: भारतीय गोलंदाजी कधी सुधारणार? डेथ ओव्हर्समध्ये बुमराहचीही धुलाई

Jasprit Bumrah: भारतीय गोलंदाजी कधी सुधारणार? डेथ ओव्हर्समध्ये बुमराहचीही धुलाई

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 26, 2022 01:24 PM IST

Jasprit Bumrah Ind Vs Aus 3rd T20: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका २-१ ने जिंकली आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसरा सामना ६ विकेट्सनी जिंकला. मात्र, या सामन्यानंर भारतीय गोलंदाजीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने कांगारूंचा ६ गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिडने अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. भारताकडून विराट आणि सुर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली.

दरम्यान, जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाल्यानंतर भारतीय गोलंदाजी मजबूत होईल, असे वाटत होते. पण तसे होताना दिसत नाही. कारण जसप्रीत बुमराहनेही ऑस्ट्रेलियाविरुदधच्या तिसऱ्या सामन्यात मोठ्या प्रमाणात धावा दिल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

हैदराबाद येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने १८६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई

सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेगवान सुरुवात केली होती. मात्र मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कंट्रोलमध्ये ठेवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १६० धावांपर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. परंतु टीम डेव्हिड आणि डॅनिएल सॅम्स यांनी शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.

अखेरच्या तीन षटकांत भारतीय गोलंदाजांनी एकूण ४६ धावा दिल्या. यावरून भारतीय संघाच्या खराब गोलंदाजीचा अंदाज लावता येऊ शकतो. या सामन्यातही भुवनेश्वर कुमारने १८व्या षटकात २१ दिल्या. तर १९ वे षटक बुमराहने टाकले, त्याची गोलंदाजीही ऑसी फलंदाजांनी फोडून काढली. बुमराहने १९ व्या षटकात १८ धावा दिल्या.

तिसऱ्या सामन्यात भुवी-बुमराहची कामगिरी-

भुवनेश्वर कुमार: ३ षटके, ३९ धावा आणि १ विकेट

जसप्रीत बुमराह: ४ षटके, ५० धावा

WhatsApp channel

संबंधित बातम्या