मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Rangabhumi Din: मराठी रंगभूमीला पुन्हा सोन्याचे दिवस; ‘ही’ नाटकं खेचतायत तुफान गर्दी

Marathi Rangabhumi Din: मराठी रंगभूमीला पुन्हा सोन्याचे दिवस; ‘ही’ नाटकं खेचतायत तुफान गर्दी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 05, 2022 11:41 AM IST

Marathi Rangabhumi Din: आज (५ नोव्हेंबर) ‘मराठी रंगभूमी दिन’. आजच्याच दिवशी विष्णूदास भावे यांनी १८४३ साली 'सीता स्वयंवर' हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला.

Marathi Theatre Day
Marathi Theatre Day

Marathi Rangabhumi Din: आज (५ नोव्हेंबर) ‘मराठी रंगभूमी दिन’. मराठी मनोरंजन विश्वाला रंगभूमीची तशी मोठी परंपरा आहे. मराठी रंगभूमीने या मनोरंजन विश्वाला अनेक दिग्गज कलाकार दिले. आजही ही परंपरा तशीच सुरू आहे. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली 'सीता स्वयंवर' हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला आणि म्हणूनच आजचा दिवस अर्थात ५ नोव्हेंबर 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

मध्यंतरीच्या काळात मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे आणि नाट्यगृहांची दुरवस्था यामुळे अनेकदा मराठी नाटकांना मोठा तोटा सहन करावा लागला. मात्र, सध्या नाटकांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले आहेत. नाटकांचे विषय आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची पावले नाट्यगृहांकडे वळू लागली आहेत. यातच काही नाटकांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.

सध्या चित्रपटांइतकाच नाटकांना देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठी प्रेक्षक देखील नाटकांकडे आनंदाने वळू लागले आहेत. अनेकदा नाट्यगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड पाहायला मिळतात. यावरूनच एकंदरीत नाट्यभूमी पुनरुज्जीवीत होतेय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यात अनेक कलाकारांचा आणि नाटकांचा मोठा वाटा आहे. कलाकारांनाच नव्हे तर, प्रेक्षकांना येणाऱ्या समस्या यावर काही कलाकारांनी थेट भाष्य केलं, यामुळे नाट्यगृहांची अवस्था सुधारली. तर, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा देखील प्रभावी वापर केला गेला. या सगळ्याचाच फायदा सध्या नाटकांना मिळत आहे.

‘या’ नाटकांची होतेय चर्चा!

नुकताच ‘चारचौघी’ या नाटकाने एका नव्या रुपात रंगमंचावर एन्ट्री घेतली. या नाटकाने अगदी पहिल्या शोपासून हाऊसफुल गर्दी जमवली. आज जागतिक रंगभूमी दिनी या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग साजरा होणार आहे. याशिवाय प्रशांत दामले आणि कविता लाड यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक देखील रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’नंतर प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली, ज्याला नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय ’३८ कृष्णा व्हिला’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘इब्लिस’सारख्या थ्रिलर, सस्पेन्स नाटकांनी देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. ‘संजय छाया’, ‘खरं खरं सांग’, ‘दादा एक गुडन्यूज आहे’ अशा कौटुंबिक नाटकांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले आहे. तर, ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ आणि ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकांमुळे चिमुकली पावलं देखील नाट्यगृहांकडे वळली. अगदी आजच्या मराठी रंगभूमी दिनी देखील या नाटकांचे यशस्वी प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग