मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammad Rizwan: मोहम्मद रिझवान टी-20 चा नवा बादशाह, अशी कामगिरी करणारा तिसराच पाकिस्तानी

Mohammad Rizwan: मोहम्मद रिझवान टी-20 चा नवा बादशाह, अशी कामगिरी करणारा तिसराच पाकिस्तानी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 07, 2022 08:51 PM IST

ICC T20 Ranking Mohammad Rizwan: पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा टी-20 चा नवा बादशाह झाला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला अव्वल स्थानी होता. बाबर सध्या अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आशिया चषकात आतापर्यंत तीन सामन्यांच्या तीन डावात ३३ धावा केल्या आहेत.

Mohammad Rizwan
Mohammad Rizwan

आशिया कप टी-20 स्पर्धेत आतापर्यंत काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये मोहम्मद रिझवान, कुसल मेंडिस, विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे. या कामगिरीचा परिणाम बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या टी-२० क्रमवारीवरही दिसून आला. मोहम्मद रिझवान हा टी-20 चा नवा बादशाह झाला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला अव्वल स्थानी होता. बाबर आझमची तब्बल ११५५ दिवसांनंतर पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे.

रिझवान सध्या आशिया कपमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत १९२ धावा केल्या असून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रिझवानने हाँगकाँगविरुद्ध नाबाद ७८ आणि भारताविरुद्ध ७१ धावांची खेळी केली होती. या दोन डावांमुळे पाकिस्तानच्या संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आशिया चषकात आतापर्यंत तीन डावात ३३ धावा केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा रिझवान हा पाकिस्तानचा तिसराच फलंदाज आहे. त्याच्या आधी बाबर आणि मिसबाह-उल-हक हे टी-20 चे नंबर वन फलंदाज ठरले आहेत.

त्याचबरोबर भारताविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या पाथुम निसांकाच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. तो टी-20 क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. निसांकाने आशिया चषकात गेल्या तीन सामन्यांमध्ये २०, ३५ आणि ५२ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजलाही टी-20 क्रमवारीत सर्वाधिक फायदा झाला आहे. सुपर-४ सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. त्याने १४ स्थानांनी झेप घेत १५ व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने ७२ धावांच्या खेळीमुळे चार स्थानांची सुधारणा करत १३व्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजीत श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फायदा

गोलंदाजीत श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंना सर्वाधिक फायदा झाला आहे. मुजीब उर रहमान सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी तो ९ व्या क्रमांकावर होता. श्रीलंकेचा महेश तिक्षाही टॉप-१० मध्ये पोहोचला आहे. त्याने पाच स्थानांनी झेप घेतली असून टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. शादाब खान एका स्थानाच्या सुधारणेसह १४ व्या स्थानावर आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या