मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Nagin Dance: क्रिकेटमध्ये कसा आला नागिन डान्स; श्रीलंका-बांगलादेशचं कनेक्शन काय? वाचा संपूर्ण स्टोरी

Nagin Dance: क्रिकेटमध्ये कसा आला नागिन डान्स; श्रीलंका-बांगलादेशचं कनेक्शन काय? वाचा संपूर्ण स्टोरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 02, 2022 12:53 PM IST

Story Of Naagin Dance Rivalry Between Sri Lanka & Bangladesh:आशिया चषक २०२२ मध्ये ब गटातील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा दोन गडी राखून पराभव केला. तसेच, श्रीलंकेने सुपर फोरमध्येही प्रवेश केला. या थरारक विजयानंतर चमिका करुणारत्नेने नागीन डान्स करत सेलिब्रेशन केले. या दोन देशांदरम्यान नागीन डान्सची सुरुवात कशी झाली ते याठिकाणी जाणून घेणार आहोत.

Sri Lanka vs Bangladesh
Sri Lanka vs Bangladesh

आशिया चषक २०२२ मध्ये ब गटातील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा दोन गडी राखून पराभव केला आणि सुपर फोरमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ ग्रुप स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या स्पर्धेतून बाहेर पडणारा बांगलादेश हा पहिला संघ आहे.

हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यानंतर श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेने नागीन डान्स केला. त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर खेळाडूंनी नागीन डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक सामन्यांमध्य नागीन डान्स पाहायला मिळाला आहे.

क्रिकेटमध्ये नागीन डान्सची सुरुवात २०१६ पासून झाली

बांगलादेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज नजमुल इस्लाम हा बांगलादेश प्रीमियर लीग २०१६ मध्ये राजशाही किंग्जकडून खेळत होता. या स्पर्धेतील एका सामन्यात विकेट घेतल्यानंतर त्याने नागीन डान्स केला. त्यानंतर नजमुल चर्चेत आला आणि त्याची ही ओळखच बनली. तो विकेट घेतल्यानंतर नागीन डान्स करतच सेलिब्रेशन करायचा. 

बांगलादेश-श्रीलंका मॅचमध्ये नागिन डान्स कसा आला

नजमुलने २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने ४ विकेट घेतल्या. श्रीलंकेचा धनुष्का गुणतिलका हाही त्याचा बळी ठरला. यष्टिरक्षक मुशफिकर रहीमने त्याला यष्टिचित केले. यानंतर बांगलादेशचा संपूर्ण संघ नजमुलसह नागिन डान्स करु लागला.

त्यानंतर पुढच्या सामन्यात श्रीलंकेच्या गुणातिलकाने १८ व्या षटकात बांगलादेशचे दोन बळी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह श्रीलंकेच्या संघाने मालिका जिंकली. त्यानंतर श्रीलंकन संघाने नागीन डान्स करत मालिका विजयाचे सेलिब्रेशन केले. येथूनच हा डान्स दोन देशांमधील प्रतिस्पर्ध्यांचे प्रतीकच बनले.

निदहास ट्रॉफी २०१७ मध्ये बांगलादेशच्या संघाने घातला होता धुमाकूळ

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेनंतर निदहास ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ सहभागी झाले होते. २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्या सामन्यात ३५ चेंडूत ७२ धावा करणाऱ्या मुशफिकुर रहीमने नागिन डान्स केला. निदहास ट्रॉफीत टीम इंडियाने सर्वप्रथम फायनल गाठली होती.

तिसारा परेरा आणि नुरऊल हसन यांच्यात जोरदार राडा

दरम्यान, श्रीलंका-बांगलादेश संघांमधील अखेरचा साखळी सामना हा सेमी फायनलप्रमाणेच झाला होता. या सामन्यात अनेकदा वादवादी झाली. बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या पाच चेंडूत १२ धावांची गरज होती. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू तिसारा परेराने बाऊन्सर टाकला. त्यानंतर दुसरा चेंडू शॉर्ट पीच टाकला. बांगलादेशच्या खेळाडूंनी नो बॉलची मागणी केली. पण पंचांनी तो नो बॉल दिला नाही. या चेंडूवर मुशफिकुर रहीम धावबाद देखील झाला. यानंतर बांगलादेशचे फलंदाज आणि श्रीलंकेच्या खेळाडूंचा अंपायरशी बराच वेळ संवाद झाला. त्यानंतर बांगलादेशचा नुरउल हसन हा पाणी घेऊन मैदानात गेला आणि त्याने पंचांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. यावर लंकेच्या तिसारा परेराने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. परेरा आणि हसन यांना मॅच रेफरीने दंडही ठोठावला होता.

कर्णधार शकीबने फलंदाज माघारी बोलावले-

यानंतरही अंपायरने दुसरा चेंडू नो-बॉल दिला नाही. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने आपल्या फलंदाजांना माघारी बोलावले. थोड्यावेळाने पुन्हा खेळ सुरु झाला. शेवची महमुदुल्लाहने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर मात्र, बांगलादेशच्या खेळाडूंनी नागीन डान्स करत मैदानावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्या दरम्यानही दोन्ही संघातील काही खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. तेव्हापासूनच नागीन डान्स हा दोन देशांमधील शत्रुत्वाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

 

WhatsApp channel