मराठी बातम्या  /  क्रीडा  /  HBD Dhoni: 'गांगुलीने जिंकायला शिकवलं तर, धोनीने...' कैफ-कोहलीच्या हटके शुभेच्छा

HBD Dhoni: 'गांगुलीने जिंकायला शिकवलं तर, धोनीने...' कैफ-कोहलीच्या हटके शुभेच्छा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 07, 2022 03:50 PM IST

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने खास ट्वीट करुन माहीला शुभेच्छा दिल्या आहेत.

ms dhoni
ms dhoni

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ४१ वर्षांचा झाला आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नाही. मात्र, त्याची लोकप्रियता ही किंचितही कमी झालेली नाही. त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आज वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून माहीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने खास ट्वीट करुन माहीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये विराटने धोनीचा उल्लेख मोठा भाऊ असा केला आहे. सोबतच विराटने धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याचे आभार मानले आहेत. तसेच, धोनीसारखा दुसरा टीम लीडर जगात असूच शकत नाही, असेही विराट म्हणला.

शुभेच्छा देताना कोहलीने टीम इंडिया आणि आयपीएलचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो धोनीसोबत दिसत आहे. यासोबत कोहलीने लिहिले की, "तुझ्यासारखा नेता होणे नाही. तु भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या मोठ्या भावासारखा आहेस. तुझ्याबद्दल नेहमीच प्रेम आणि आदर याशिवाय काहीही नाही".

गांगुलीने जिंकायचे कसे शिकवले तर धोनीने त्याची सवय बनवली-

कोहलीशिवाय माजी खेळाडू मोहम्मद कैफनेही एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले आहे की, 'दादा (सौरव गांगुली) यांनी आम्हा तरुणांना कसे जिंकायचे हे शिकवले, तर धोनीने सतत कसे जिंकायची याची सवय लावली. वेगवेगळ्या कालखंडातील दोन महान कर्णधार, एका दिवसाच्या कालावधीत जन्माला आले. भारतीय क्रिकेटला आकार देणाऱ्या महान लोकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा". गांगुलीचा वाढदिवस एक दिवसानंतर म्हणजेच ८ जुलै रोजी असतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती-

महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना हा २०१९ वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. त्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताचा न्युझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो.

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन-

२००४ मध्ये पदार्पण करणारा धोनी पुढील काही वर्षात खूपच यशस्वी क्रिकेटर बनला. त्याने सर्वप्रथम भारताला २००७ चा टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर २०११ चा वनडे वर्ल्डकपही भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकला होता. तसेच, २०१३ सालच्या चॅम्पिन्स ट्रॉफीवरही भारताने धोनीच्याच नेतृत्वात नाव कोरले होते.

 

WhatsApp channel